Mira Road Murder: `सरस्वतीने आम्हाला सांगितलं होतं की, तो काका...`, अनाथाश्रमातील कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा
Mira Road Murder: मीरा रोडमधील (Mira Road) निर्घृण हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आरोपी मनोज साने (Manoj Sane) याने आपल्या लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्यची (Saraswati Vaidya) हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. इतकंच नाही तर काही मृतदेह तुकडे मिक्सरमध्ये वाटले तर इतर कुकरमध्ये शिजवले.
Mira Road Murder: महाराष्ट्र सध्या एका हत्याकांडाने हादरला आहे. मिरा रोडमध्ये 56 वर्षीय मनोज साने (Manoj Sane) याने आपल्या लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्यची (Saraswati Vaidya) हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. बुधवारी संध्याकाळी मिरा रोडच्या इमारतीमधील सातव्या मजल्यावर सरस्वती वैद्य यांचा अत्यंत वाईट अवस्थेत मृतदेह आढळला. आरोपीने मृतदेहाचे काही तुकडे बादलीत भरुन ठेवले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून अनेकांना श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण झाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मृतदेहाचे काही तुकडे मिक्सरमध्ये वाटले तसंच काही तुकडे कुकरमध्ये शिजवले होते. सरस्वती वैद्य अनाथ होती. अहमदनगरमधील जानकीबाई आपटे बालिकाश्रम या अनाथाश्रमात त्यांचा सांभाळ झाला होता. येथील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरस्वतीने त्यांना मनोज साने आपला काका असल्याचं सांगितलं होतं.
"तिने आम्हाला माझा काका मुंबईत राहत असल्याचं सांगितलं होतं. तसंच आपण त्याच्यासोबत राहत असल्याची माहिती दिली होती. काका कपड्यांचा व्यापारी असून फार श्रीमंत आहे असं ती म्हणाली होती," असं अनु साळवे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे.
सरस्वतीने दोन वर्षांपूर्वी अनाथाश्रमाला शेवटची भेट दिली होती. मात्र यावेळी ती फार दु:खी दिसत होती असंही त्यांनी सांगितलं आहे.
मनोज साने अविवाहित होता. मुंबईतील बोरिवलीत तो वास्तव्यास होता. त्याचं कुटुंबही तिथेच राहतं. पण नंतर तो कुटुंबापासून दूर राहू लागला होता. बोरिवलीतील एका किराणा दुकानात तो काम करत होता. पीडित सरस्वती वैद्य अनेकदा किराणा दुकानात जात असे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 2014 मध्ये त्यांच्यात मैत्री झाली आणि 2016 पासून ते दोघे एकत्र राहू लागले. तीन वर्षांपूर्वी मीरा रोडमधील फ्लॅटमध्ये राहण्यास आले होते.
घऱातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर शेजाऱ्याला संशय आला होता. यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहिलं असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी दार उघडून पाहिले असता सर्वांना धक्काच बसला. घरामध्ये सरस्वती वैद्य यांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. आरोपी मनोज साने याने अर्धवट मृतदेह घरातच टाकून दिला होता.
नेमकी घटना काय?
मीरा भाईंदर परिसरात मीरा रोडवर असलेल्या गीता आकाश इमारतीच्या (Geeta Akash Building) फ्लॅटमध्ये मनोज साने (Manoj Sane) याने लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यची (Saraswati Vidya) निर्घृण हत्या केली आहे. एवढंच नाही तर आरोपीने करवतीच्या मदतीने मृतदेहाचे अनेक तुकडे केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने तुकडे कुकरमध्ये शिजवून ते कुत्र्यांना खाऊ घातल्याचे समोर आले आहे. मृतदेहाचे तुकडे एका पिशवीत बांधून आरोपी साने त्याची विल्हेवाट लावणार होता. मात्र शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
मात्र पोलिसांच्या चौकशीत मनोज सानेने धक्कादायक खुलासा केला आहे. मनोज सानेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सरस्वतीने 4 जून रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. "त्यादिवशी मी घरी पोहोचलो तेव्हा पाहिले की, सरस्वती बेडवर मृतावस्थेत पडली होती आणि विष प्राशन केल्याने तिच्या तोंडातून फेस येत होता. सरस्वतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल होईल, अशी भीती मला वाटत होती. म्हणूनच मी तिच्या प्रेताचे तुकडे केले आणि नंतर त्याची विल्हेवाट लावली," असे मनोजने सांगितले.