गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : परभणी (Parbhani) जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे. सोनपेठ पाथरी सेलू राष्ट्रीय महामार्गाचीही अवस्था अत्यंत दयनीय आहे. पाथरीवरून सेलूला जाण्यासाठी दोन ते तीन तास लागत आहेत. तसेच या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रांणी (Babajani Durrani) यांनी आक्रमक होत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबाजानी दुर्रांणी हे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. या मागणीसाठी पाथरी सेलू रोडवरील गुलशन चौकात राष्ट्रवादीच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.  यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. 


दरम्यान, या आंदोलनानंतर प्रशासनाचीही झोप उडाली. जालना येथील बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी होईपर्यंत रास्तारोको आंदोलन सुरुच होते. यावेळी वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.अधिकाऱ्यांनी हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करून देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतरच आमदार बाबाजानी यांनी रास्तारोको आंदोलन माघे घेतले.


त्यांना थोडा वेळ देऊ आणि हे काय करतात बघू - बाबजानी


नव्या मंत्रीमंडळाबाबतही बाबाजानी दुर्राणाी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "शिवसेनेचे आमदार फोडून नव मंत्रिमंडळ यांनी स्थापन केले आहे. त्यांना काम करण्यासाठी थोडी संधी द्यावी लागेल. पण एवढी मोठी अतिवृष्टी झाली अद्याप नुकसानीचे पंचनामे सुरू झाले नाहीत. मोठ्या आशेने त्यांनी जुने सरकार पाडून नवं सरकार आणलंय. यांना थोडा वेळ देऊ आणि हे काय करतात बघू. नाहीतर यांच्या विरोधात आक्रमक पद्धतीने आम्ही आवाज उठवू," असे बाबाजानी म्हणाले.