ठाणे : आर्थिक घोटाळ्याप्रकरणी जेलची हवा खात असलेले अपक्ष आमदार रमेश कदम चक्क घोडबंदर रोडवरील ओवळा येथील पुष्पांजली रेसीडन्सी या सोसायटीमधील प्लॅटवर सापडले. यावेळी त्यांच्याकडून ५३ लाखांपेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली. तसेच आणखी एकाला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, अटकेत असणाऱ्या रमेश कदमांवर काही पोलिसांचा 'आशीर्वादा'त असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मी माझी काही औषधे आणण्यासाठी फ्लॅटवर गेलो होतो, असे स्पष्टीकरण रमेश कदम यांनी दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळवर अपक्ष आमदार रमेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या काळात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. अटकेत असलेले सोलापुरातील मोहोळ विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार रमेश कदम घोडबंदर येथील फ्लॅटमध्ये आढळल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.


रमेश कदम हे न्यायालयीन कोठडीत आहेत. सध्या त्याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस बंदोबस्तात मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी येत्या सोमवारी पुन्हा उपचारासाठी घेऊन येण्यास सांगितले. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात कदम यांना ठाणे कारागृहात आणले जात होते. मात्र, कदम खासगी गाडीने घोडबंदर रोडवरील  पुष्पांजली रेसीडन्सी या सोसायटीमधील फ्लॅटमध्ये गेलेत.


यावेळी फ्लॅटवर त्यांच्याकडून जवळपास ५३ लाख ४६ हजार रुपये जप्त करण्यात आले. त्याच्यासोबतच्या राजू या व्यक्तीने आपण निवडणूकीला उभे राहण्यासाठी जमविल्याचे पोलिसांना सांगितले आहे. आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. अधिक तपास सुरु आहे.