`अंत्यसंस्कारात लाकडांचा वापर टाळा अन्...`, राज ठाकरेंचा सल्ला हिंदू धर्मीयांना मान्य होईल का?
Raj Thackeray On Hindu Last rites : हिंदू धर्मातील जुन्या परंपरा बदला. अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांचा वापर टाळा, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलीय. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर हिंदू धर्मियांना नेमकं काय वाटतं? पाहूयात हा रिपोर्ट..
Raj Thackeray On Electric funeral : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकायचं ठरवलंय. बालविवाह, विधवा केशवपन, मंदिरातील पुजा-यांची अरेरावी, अस्पृश्यता, हुंडा प्रथा अशा हिंदू धर्मातील अनेक जुनाट चालीरिती-प्रथा, परंपरांच्या विरोधात प्रबोधनकारांचा कोदंडाचा टणत्कार घुमला. आता राज ठाकरेंनीही हिंदू धर्मातील परंपरा बदलण्याची मागणी केलीय. अंत्यसंस्कार करताना लाकडांचा वापर टाळा, त्याऐवजी विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करा, असा प्रबोधनाचा डोस राज ठाकरेंनी हिंदूंना पाजलाय.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
भारतात सध्या बेसुमार जंगलतोड सुरू आहे. हजारो एकर जमिनीची जंगलतोड केली जातीये. मी या गोष्टींचा विचार करत होतो. आपल्यातील काही गोष्टी सुधारणं गरजेचं आहे. होळी आली की सांगतात जंगलतोड करू नका. आपण आपल्या धर्माकडे पाहिलं पाहिजे. आपल्या धर्मातील हजारो लोकं मरतात तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार लाकडाने होतो. त्यासाठी जंगलतोड होते. लाकडाचा सर्वाधिक वापर स्मशानभूमीत होतो. आपण विद्यूत दाहिनीत आपण अंत्यसंस्कार करत नाही. ते प्रमाण अत्यंत कमी आहे. सरकारने विद्युत दाहिन्यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. त्याशिवाय ही गोष्ट थांबणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
दरम्यान, राज ठाकरेंच्या या सुधारणावादी भूमिकेचं माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी समर्थन केलंय. दुसरीकडं भाजपच्या आध्यात्म आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंनी मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केलाय. हिंदू धर्मातील सनातन काळापासून सुरू असलेल्या परंपरा बदलण्याचा प्रश्नच नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
एका मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारण 3 मण म्हणजे 120 किलो लाकडं लागतात. बेसुमार सुरू असलेली जंगलतोड थांबवण्यासाठी, ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचण्यासाठी राज ठाकरेंनी हा उपाय सुचवलाय. हिंदूजननायक अशी स्वतःची प्रतिमा राज ठाकरेंनी अलिकडच्या काळात उभी केलीय. त्यांच्या या नव्या भूमिकेचं पर्यावरणप्रेमींकडून स्वागत होईल. मात्र लाकडांवर अंत्यसंस्कार करण्याची परंपरा थांबवण्याची सूचना हिंदू धर्मियांना किती रुचेल? हा प्रश्नच आहे.