Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणाचा (Maharashtra Politics) चिखल झाला, असा महाराष्ट्र कधीही नव्हता, विरोध असेल की पाठिंबा असेल सर्व आमने सामने असायचं अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केलीय. पनवेलमध्ये एका कार्यक्रमानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची प्रकट मुलाखत झाली. यात राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली. बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या प्रदर्शनानिमित्ताने विधानभवनात गेलो होतो, खाली सर्व आमदार बसले होते, पण कोणत्या पक्षात हेच कळत नव्हतं. आता कोणी आमदार भेटायला आला तर त्याला विचारावं लागतं आता कोणत्या पक्षात आहेस असं राज ठाकरे म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेचा कारभार हाती घेऊन पाहता का असा चिमटा त्यांनी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही काढला. राज्यातल्या राजकारणावर 22 मार्चला गुढीपाडव्याच्या सविस्तर बोलणार असं राज ठाकरेंनी म्हटलंय. कोणताही टिझर ट्रेलर देणार नाही असा टोला त्यांनी मारला. 


पुतळे कशाला हवेत?
राज्यात उभारण्यात येणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्याबाबतही राज ठाकरे यांनी परखड भूमिका मांडली आहे. आपल्याकडे स्मारक म्हणजे पुतळे अशी संकल्पना असल्याचं ते म्हणाले. पण वर्षभर पुतळ्यांकडे कोणी बघतही नाही. मुंबईतल्या इंदू मिल इथं बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक होतंय, पण त्या जागी जगातलं सर्वात मोठं वाचनालय व्हायला हवं होतं. समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाची गरज काय? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराजांचे गड किल्ले हेच त्यांचे स्मारक असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.


मतदारांना काही किंमत नाही
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मतदारांना काही किंमत आहे की नाही हे समजत नाही आज यांच्या बरोबर फुगडी तर दुसऱ्याबरोबर झिम्मा असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी माध्यमांवरही निशाणा साधला. पूर्वीचे संपादक समाज किती शहाणा आहे हे दाखवण्यासाठी लिहीत, आता मी किती शहाणा आहे हे दाखवण्यासाठी संपादक लिहितात असं सांगतांना राज ठाकरे यांनी सामना आणि मार्मिक घरी येतो पण वाचत नसल्याचं सांगतिलं.


लतादीदींवर पुस्तक
28 सप्टेंबरला लतादीदी यांची जयंती आहे, लतादीदींवर एक पुस्तक करतोय अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. मराठा वर्तमानपत्राचे हक्क मागितले होते पण मिळाले नाहीत, मराठी माणसाला वाचन वाढवलं पाहिजे, साप्ताहिक मासिक जगवली पाहिजेत, वाचलं पाहिजे नाहीतर विचाराला तोकडेपण येतं असं मतही राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत मांडलं.