कल्याण :  ठाणे नंतर कल्याण डोंबिवली येथे ही मनसेनं फेरीवाल्यानविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी पाठ वळल्यानंतर पुन्हा फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात दिसू लागलेत. त्यामुळे ही मनसेची स्टंटबाजी होती का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मनसे आंदोलन करणार यांची आधीच फेरीवाल्यांना सुगावा लागला असल्याने एखाद दुसरा फेरीवाला  वगळता स्कायवॉक आणि स्थानक परिसरात  जास्त फेरीवाले दिसून आले नाही. त्यामुळे मनसैनिकांनी एक दोन फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील दुकानातील बाहेर ठेवलेल्या सामानाची नासाधूस केली.


डोंबिवलीत सामानाची तोडफोड


डोंबिवलीत सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काही दुकानांच्या बाहेर ठेवण्यात आललेल्या सामानाची तोडफोड केली. मनसेने फेरीवाल्याना आणि महापालिकेला इशारा दिला असून मनसे आपला आक्रमक पवित्रा असाच कायम ठेवणार आहे. संपूर्ण फेरीवाला मुक्त शहर जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिलाय.


ठाण्यानंतर आता मनसेनेने आता कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आपला मोर्चा वळलाय. मनसेनेने फेरीवाल्यांना दणका देत खळ्ळ खट्याक करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनाची माहिती मिळतात अनेकांनी आपले सामान, साहित्य लपवून ठेवले. मनसे कार्यकर्ते निघून गेल्यानंतर फेरीवाले पुन्हा ठाण मांडून रेल्वे स्टेशन परिसरात होते. त्यामुळे मनसेचा धाक उरला नाही, अशी स्टेशन परिसरात कुजकूब सुरु होती.


ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील चोप


दरम्यान, ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. त्याचवेळी मांडलेल्या स्टॉल्सची तोडफोड करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली आहे.  रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेली १५ दिवसांची डेडलाईन राज यांनी दिली होती. ती आज संपताच मनसे आक्रमक झाली आहे.


चेंगराचेंगरीनंतर राज ठाकरेंचा कडक इशारा


पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाला १५ दिवसांची डेडलाईन दिली होती. ती आज संपली आणि मनसे कार्यकर्ते येथे आक्रमक झालेत. ठाणे स्टेशनबाहेर राडा पाहायला मिळाला. मनसेने फेरीवाल्यांना चांगलेच चोपल्याची चर्चा होती. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासन जागे झाले आणि  अनेक स्टेशनवर बसणाऱ्या फेरीवाल्यांना हटविले तर काही ठिकाणी फेरीवाला मुक्त परिसर केला. मात्र, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्या दिसताच आज मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेत. त्यानंतर ठाणे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर मनसे स्टाईल चोप देण्यात आला.