नाना पाटेकरांना मनसेचे प्रत्युत्तर
नाना पाटेकर आणि मनसे हा वाद पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
मुंबई : नाना पाटेकर आणि मनसे हा वाद पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
नाना पाटेकरांनी मनसेचं एक मत गेलं असं उत्तर दिल्यावर मनसेकडून पुन्हा एकदा याला प्रत्युत्तर मिळालं आहे. मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून नानांना उत्तर दिलं आहे. हे उत्तर मनसे स्टाईलने असल्यामुळे पुन्हा एकदा या विषयाची चर्चा रंगली आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे की, नाना पाटेकर देखील भैया भूषण पुरस्कारात सहभागी झाले आहेत. या अगोदरच्या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टार्गेट केलं आहे. तसेच त्यांना देखील भैय्या भूषण पुरस्कार नक्की मिळेल असं ट्विट केलं होतं.
नेमका वाद काय?
नाना पाटेकर यांनी मनसेने फेरीवाल्यांच्याप्रती घेतलेल्या भूमिकेवर आपलं मत मांडलं होतं. भाकरीसाठी धडपणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांना उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करू नये. ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावं,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी नानांच्या वक्तव्यावर टीका केली होती. ‘प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं,” असेही नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय.