`इतरांवर शेणगोळे फेकून तुमचा...`; राजमुद्रेवरुन राज ठाकरेंना ट्रोल करणाऱ्याला मनसेनं झापलं
MNS Angry On Troller: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना ट्रोल करणाऱ्या एका भाजपा समर्थकाला पक्षाने दिलं जशास तसं उत्तर. सोशल मीडियावर या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.
MNS Angry On Troller: सोशल मीडियावर राजकीय ट्रोलिंग आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची आयटी विंग आज सक्रीय आहे. मात्र कधीतरी अगदी टोकाची टीका झाल्यानंतर परस्परविरोधी पक्ष एकमेकांवर सोशल मीडियावरच वाद घालू लागतात. तर कधीतरी एखाद्या ठराविक पक्षाच्या ट्रोलर्सला राजकीय पक्षाच्या अकाऊंटवरुन जशास तसं उत्तर दिलं जातं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना ट्रोल करणाऱ्या एका भाजपा समर्थकाला मनसेच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन उत्तर देण्यात आलं आहे.
नक्की प्रकरण काय?
झालं असं की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भ देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पोस्ट करत टीका केली आहे. पुरोगामी महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा, अशा कॅप्शनसहीत हा ट्रोलिंग करणारा फोटो पोस्ट करण्यात आला. या पोस्टवर मनसे अधिकृतच्या ट्वीटर हॅण्डलवरुन रिप्लाय करण्यात आला. "अशा पोस्ट्सच्या मागे कोण आहेत हे आम्हाला चांगलंच माहिती आहे पण इतरांची बदनामी करून, इतरांवर शेणगोळे फेकून कदाचित तुमचा अहंकार सुखावेल पण तुम्हाला मराठी मन जिंकता येणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणालाही न जुमानता रयतेसाठी फक्त कल्याणकारी 'राजसत्ते'ला महत्त्व दिलं त्यांच्या विचारांबद्दल 'पाखंडी धर्मसत्ते'च्या आहारी गेलेल्या लोकांनी बोलूच नये," असं मनसेनं म्हटलं आहे.
अशा ट्रोलर्सला भीक न घालण्याची समर्थकाची मागणी
मनसेच्या या पोस्टवर संतोष दुधाळे नावाच्या समर्थने असा ट्रोलर्सला पक्षाने फारसं महत्त्व देऊ नये अशी प्रतिक्रिया नोंदवली. "मनसे अधिकृतने या आधी अशा विकृत ट्रोलर्सना भीक घातली नाही, मग आताही नको. कृपया यापुढे ही असं करु नये याने ते भामटे जास्त माजतील," अशी प्रतिक्रिया दुधाळे यांनी नोंदवली.
दीडदमडीचे बेवारस ट्रोलर्स
या पोस्टवर मनसे अधिकृतच्या हॅण्डलवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. "संतोषजी, आपल्या मताशी सहमत. ठाकरे ट्रोलर्सना कधीच भीक घालत नाहीत. प्रबोधनकार ठाकरे जेव्हा आपली भूमिका मांडायचे तेव्हा त्यांची जिवंतपणी अंतयात्रा काढली जात होती, घरासमोर मेलेलं गाढव टाकलं जात होतं पण प्रबोधनकार ठाकरे बधले नाहीत, त्यांची लेखणी तितक्याच त्वेषाने ढोंगी मानसिकतेवर तुटून पडायची. त्याच प्रबोधनकारांचा वारसा आमच्याकडे आहे, महाराष्ट्रहिताची भूमिका घेण्यात आम्ही कधीच कचरणार नाही, आणि दीडदमडीच्या बेवारस ट्रोलर्सना कधीही भीक घालणार नाही!" असं मनसेनं म्हटलं आहे.
सध्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.