मोदी नोटबंदीपासून ते राफेलपर्यंत सर्वच ठिकाणी फेल : छगन भुजबळ
मोदी नोटबंदीपासून ते राफेलपर्यंत सर्वच ठिकाणी फेल
बीड : मोदी नोटबंदीपासून ते राफेलपर्यंत सर्वच ठिकाणी फेल झाले आहेत, अशी टीका ओबीसींच्या समता मेळाव्यात समता परिषदचे संस्थापक छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केली. निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे धर्मा धर्मात, जाती-जातीत भांडण लावली जातील. अशी धोक्याची सूचना दिली. तेव्हा धोका ओळखा. एकत्र रहा. असा सल्ला भुजबळ यांनी यावेळी दिला.
बीड येथे भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर हजर होते. यावेळी भुजबळ यांना फुले पगडी देऊन सन्मानित करण्यात आले. भुजबळ यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर प्रथमच ओबीसी मेळावा घेतला. आता बीडपासून ओबीसींच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात झाल्याचा दावा भुजबळ यांनी यावेळी केला
भुजबळ यांनी यावेळी आपल्याला विनाकारण अडचणीत आणले गेल्याचे सांगत महाराष्ट्र सदन बांधकामात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला. त्यांनी आपल्या भाषणात संभाजी भिडे यांच्यावर प्रखर टीका केली. बहुजनांना फितवण्यासाठी भिडे यांनी मनोहर नाव बदलून संभाजी हे नाव घेतले, असे म्हणत भिडेंना मनुवाद पुन्हा आणायचा आहे, असे स्पष्ट केले.
हे सरकार संविधान बदलणार आहे. आरक्षण बंद करणार आहे. त्यामुळे एकत्र रहा, दुश्मनला ओळखा, असा सल्ला दिला.
दरम्यान, बीडमधील छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या मेळाव्यात जोरदार गोंधळ झाला. बीडच्या स्थानिक राजकारणातील गटबाजी या परिषदेत दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच बीड का नेता कैसा हो...जयदत्त क्षीरसागर जैसा होच्या जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे या मेळाव्यात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. मात्र त्यानंतर भुजबळांसह सर्वच नेत्यांनी शांततेचं आवाहन केल्यामुळे अखेर मेळाव्याला शांततेत सुरूवात झाली.