Modi Government 3.0: अजित पवार गटाला मोठा धक्का! केंद्रात एकही मंत्रिपद नाही?
Modi Government 3rd Term Ajit Pawar NCP Group: अजित पवार गटाने लोकसभेच्या एकूण चार जागा लढवल्या होत्या. मात्र त्यापैकी केवळ एका जागी त्यांना यश मिळालं आहे. अजित पवार गटाचे केवळ सुनील तटकरे लोकसभेला निवडून आले आहेत.
Modi Government 3rd Term Ajit Pawar NCP Group: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारचे नेते म्हणून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील सहा खासदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं असलं तरी राज्यात मागील वर्षी सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला एकही मंत्रिपद आजच्या शपथविधीमध्ये दिलं जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार गटाचे राज्यातील एकमेव खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या घरी बैठकीसाठी गेले आहेत. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत इतर मंत्रीही उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. सदर बैठक ही अजित पवार गटाची मनधरणी करण्यासाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या मेरीटनुसार अजित पवार गटाला तिकीट नाकारण्यात आलं आहे की यामागे इतर काही कारणं आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अजित पवार गटाने महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 4 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ रायगडची एकमेव जागा अजित पवार गटाला जिंकता आली. येथून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिंकून आले. दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. याचप्रमाणे अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटीलही शिरुर मतदारसंघातून पराभूत झाले. अजित पवार गटाच्या अर्चना पाटील धाराशीव मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याकडून पराभूत झाले.
महाराष्ट्राला मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये सहा मंत्रीपद मिळाली होती. यामध्ये भिवंडीचे माजी खासदार कपिल पाटील, दिंडोरीच्या माजी खासदार भारती पवार, राज्यसभेचे खासदार नारायण राणे, आरपीआयचे नेते रामदास आठवले, नागपूरचे खासदार नितीन गडकरी, राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांना संधी देण्यात आली होती. मात्र यापैकी कपिल पाटील, भारती पवार यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तर यंदाच्या कॅबिनेटमधून सिंधुदूर्ग-रत्नागिरीमधून जिंकलेले नारायण राणे तसेच विद्यमान राज्यसभा खासदार भागवत कराड यांना संधी देण्यात आलेली नाही. त्याऐवजी काही नव्या चेहऱ्यांना थेट केंद्रीय मंत्रीमंडळाची लॉटरी लागली आहे.
मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल या दिग्गज आणि यापूर्वी केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या नेत्यांबरोबरच रावेरच्या खासदार रक्षा खडसे, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ तसेच बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच मंत्रीमंडळात स्थान दिलं जाणार आहे. तसेच यापूर्वी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री म्हणून जबाबदारी पाहणाऱ्या आरपीआयच्या रामदास आठवलेंना यंदाची मंत्रीपद दिलं जाणार आहे.
मोदी आज सायंकाळी सव्वासात वाजता दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.