सावधान! ई वाहनांमधील फेरबदल पडणार महागात, परिवहन विभागाकडून होणार कारवाई
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये परस्पर फेरफार करून वेग मर्यादा वाढवण्याचे उपद्वयाप
अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : इंधनाचे वाढते दर तसंच वाढतं प्रदूषण या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. ई वाहनांची निर्मिती तसंच वापरासाठी शासनाकडून देखील प्रोत्साहन मिळत आहे. याचा परिणाम म्हणून रस्त्यावर इलेक्ट्रिक बाइक, इलेक्ट्रिक स्कूटर, त्याप्रमाणे इलेक्ट्रिक कार मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्या आहेत.
पण सुसाट वेगाची सवय असलेल्या वाहनचालकांची इलेक्ट्रिक गाडी हातात घेतल्यानंतर मोठी अडचण होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वेगमर्यादा कमी आहे. त्यामुळे अशा वाहनांमध्ये परस्पर फेरफार करून वेग मर्यादा वाढवण्याचे उपद्वयाप सुरू आहेत. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
राज्य परिवहन विभागामार्फत ई वाहनांच्या तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार पुणे परिवहन विभागामध्ये मागील दोन आठवड्यांत 23 शोरूमची झाडाझडती घेण्यात आली. 51 ई बाईकची तपासणी करण्यात आली. त्यातील 15 ई बाईक सदोष आढळल्या. त्यापैकी 12 ई बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.
वाहनाचा वेग वाढविण्यासाठी ई वाहनांच्या बॅटरीत फेरफार करण्यात येत असल्याचे समोर आलं आहे. मात्र हा बदल धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी ई वाहंनानी पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याशिवाय अती वेग अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
25 किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा कमी वेग मर्यादा असलेल्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीची आवश्यकता नाही. ते चालवण्यासाठी लायसन्सची देखील गरज नाही. त्यामुळे 250 वॉट ची बॅटरी असलेल्या वाहंनाच्या दुचाकी खरेदीचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण ही वाहने खरेदी करून त्यामध्ये फेरबदल करत आहेत.
या पार्श्वभूमीवर परिवहन विभाग सक्रिय झाला आहे. ई बाइक मध्ये नियमबाह्य फेर बदल केलेला आढळल्यास एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. ई बाइक मध्ये अंतर्गत बदल करून वेगमर्यादा वाढवल्यास बाईक जप्त करण्यात येईल असा इशारा परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे. ही बाईक मध्ये बदल करून देणाऱ्या व्यावसायिकांवर देखील कारवाई करण्यात येईल असे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर अजित शिंदे यांनी म्हटलं आहे.