कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी मुलांना देणार मोहाच्या फुलाचे लाडू; कुपोषणमुक्त कृती दलाच्या सूचना
राज्यातील कुपोषणाबाबत जिल्हानिहाय आढावा बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहे. या पौष्टिक आहारामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून अॅनिमियाचे प्रमाण कमी होईल, असं कृती दलाचं म्हणणं आहे.
राज्यातील शाळकरी मुलांमधील कुषोषणाचं आणि अॅनिमियाचं प्रमाण कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पौष्टिक आहाराचा अभाव आणि कुपोषणामुळे राज्यातील लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण वाढतंय. याला आळा घालण्यासाठी राज्यातील कुपोषित मुलांना मोहाच्या फुलांपासून बनवलेले लाडू देण्याच्या सूचना कुपोषणमुक्त कृती दलाने दिलेत. त्यानुसार आता राज्यातील लहान मुलांना हे लाडू देण्यात येणार आहेत.
राज्यातील कुपोषणाबाबत जिल्हानिहाय आढावा बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहे. या पौष्टिक आहारामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून अॅनिमियाचे प्रमाण कमी होईल, असं कृती दलाचं म्हणणं आहे.
बालकं आणि किशोरवयीन मुलांमध्ये अशक्तपणा
नुकतंच राज्याच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या आरोग्य तपासणीतून 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांच्या केलेल्या आरोग्य तपासणीत 70 हजारांहून अधिक बालकं आणि किशोरवयीन मुलांमध्ये अशक्तपणा असल्याचं आढळून आलंय. याशिवाय राज्यातील प्रत्येक महिला अॅनिमियाने त्रस्त आहेत. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जातात. अॅनिमियाग्रस्तांना लोहाच्या गोळ्या दिल्या जातात. या संदर्भात आता कुपोषणमुक्त कृती दलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी मोहाच्या फुलांचे लाडू देण्याची सूचना दिलीये.
मोहाच्या फुलाचे फायदे
मोहाच्या फुलातून व्हिटॅमिन सी, प्रथिने, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट मिळतात. यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाणही वाढतं. अशक्तपणाचे रुग्ण त्यांच्या दैनंदिन पौष्टिक आहारासोबत अतिरिक्त पौष्टिक अन्न म्हणून मोहाच्या फुलांचे लाडू घेऊ शकतात, अशी माहिती आयुर्वेदिक डॉक्टरांकडून देण्यात आलीये.