अखेर माकडाने घेतला साहित्य संमेलनाचा ताबा...
त्रिवेणी साहित्य संमेलनात जेष्ठ साहित्यिक बोलत असताना, व्यासपीठावर अचानक या मर्कटराजांनी एन्ट्री घेतली.
सातारा : सातारा जिल्ह्यात उंब्रज इथं त्रिवेणी साहित्य संमेलनात एका आगंतूक पाहुण्यानं वेगळीच धम्माल उडवून दिली. त्रिवेणी साहित्य संमेलनात जेष्ठ साहित्यिक बोलत असताना, व्यासपीठावर अचानक या मर्कटराजांनी एन्ट्री घेतली.
माकडाकडून व्यासपीठावरच्या माइकचा ताबा
आधीच मर्कट, त्यात साहित्य संमेलनाला आलेले... त्यांनी आल्या आल्या थेट व्यासपीठावरच्या माइकचा ताबा घेतला.. काही केल्या ते माईक सोडायला तयार होईनात... त्यामुळं उपस्थित साहित्यिकांची चांगलीच बोबडी वळाली... अनेकांना घाम फुटला.
मर्कटराज आल्या पावली निघून गेले
तब्बल १२ मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता.. त्यामुळं साहित्य संमेलनाच्या मांडवात एकाचवेळी भीतीचं आणि हास्याचं वातावरण होतं.... नंतर या माकडानं पत्रकार कक्षाकडं आपला मोर्चा वळवला... तिथं जाऊन पत्रकारांची कागदं चाळायला सुरुवात केली. त्यानंतर हे मर्कटराज आल्या पावली निघून गेले, तेव्हा कुठं जमलेल्या मंडळींनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला.