मुंबई : Monsoon care with ayurveda : आजकालची बैठी, धावपळीची स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण अशी जीवनशैली आहे. यामुळे वाढणारे वजन किंवा स्थूलता आणि सध्या सुरु असलेला पावसाळा ऋतु, या पावसाळी हवेमध्ये आपल्या खाण्यापिण्यात व्यायामात कोणते बदल करावे आणि या बदलांमुळे वजन कमी होऊन शरीराला कोणते फायदे मिळू शकतात या विषयी माहिती घेऊ. ( weight loss in the rainy season) याबाबत  वेदिक्यूर हेल्थकेअर आणि वेलनेस पुण्याच्या आयुर्वेद (ayurveda) आरोग्य तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी ज्योत्स्ना गोखले यांनी काय घ्यावी काळजी आणि कोणता आहार असावा याबाबत सल्ला दिला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योत्स्ना गोखले सांगतात, आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या म्हणजेच ऋतू प्रमाणे आपले खाणे, पिणे, झोप, व्यायाम असावं असं सांगितलं आहे. कारण जे ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजेच सृष्टितील वातावरणामध्ये जसे बदल होत असतात त्याप्रमाणेच शरीरात सुद्धा बदल होत असतात.  


या वर्षाऋतूमध्ये  शरीरातील वात दोष वाढतो आणि पित्ताची संचिती होऊ लागते. मग अशा बदलांमुळे स्थूल व्यक्तीमध्ये जास्तीचे असणारे वजन यामुळे गुडघेदुखी, टाचदुखी किंवा पचनाच्या तक्रारी , गॅसेस ,बद्धकोष्ठता अशा समस्या डोके वर काढू लागतात. करण या काळामध्ये अग्नी हा मंद असतो म्हणजेच पचनशक्ती मंदावलेली असते. म्हणूनच पचायला हलका आहार घेतला तर वजन कमी होण्याच्या दृष्टीने मदत होतेच होते आणि सोबतीने शरीरातील दोषांचा समतोल साधला जाऊन शरीर उत्साही , उर्जावान राहते व मन प्रसन्न आनंदी राहते. 


कोणता आहार कसा घ्यावा ?


पाणी - रोज उकळून थंड केलेले पाणी प्यावे. शक्य झाल्यास गरम पाण्याचे सेवन दिवसभरात तहान जशी लागेल तसे करावे. याचा वजन कमी होण्यासाठी चांगला फायदा होतो. तसेच जेवणानंतर अर्धा ते पाऊण तासानंतर पाणी प्यावे. जेवण्याच्यामध्ये थोडे थोडे घोटभर माफक पाणी प्यावे. थोडक्यात जर जेवण झाल्या झाल्या लगेच पाणी प्यायले तर वजन, स्थूलता वाढते म्हणून हे टाळावे.


आयुर्वेदाप्रमाणे मधुर,अम्ल, लवण, स्निग्ध गुणांनी युक्त  पचण्यास हलका आणि उष्ण आहार घेण्यास सांगितलं आहे. फक्त स्थूल व्यक्तींनी गोड पदार्थ  म्हणजे साखर, दूध व दुधापासून बनलेले व कफकारक तत्सम पचण्यास जड पदार्थ अजिबात घेऊ नयेत. (उदा. पेढा बर्फी, पनीर, बासुंदी, दही, श्रीखंड गुलाबजाम, रसमलाई, रसगुल्ला इ )


दुपारच्या जेवणामध्ये गव्हाचे फुलके किंवा ज्वारीची भाकरी सोबत दुधी, पडवळ, भेंडी, लालभोपळा, दोडका, कारले, हिरवे मूग अशा भाज्या कांदा , आले, लसूण घालून केलेलया घ्याव्यात या सोबत पुदिन्याची चटणी, काकडीची टोमॅटोची कोशिंबीर, सोबत लिंबाची फोड, मुगाच्या डाळीचे वारं, तांदूळ भाजून केलेला भात , थोड्या प्रमाणात असे जेवण घ्यावे. यामध्ये खूप जास्त वजन असलेलया व मधुमेह असलेल्या व्यक्तींनी  भात  वर्ज करावा आणि जर मधुमेह नसेल तर पोळी/ किंवा भात  असे एक दिवसाआड बदल करावे.


दुपारच्या  जेवणानंतर पातळसर ताक सैंधव मीठ व काळी मिरपूड घालून घ्यावे. रात्रीचे जेवण शक्यतो 7 ते  7.30 पर्यंत घ्यावे कारण सूर्यास्तानंतर पचनशक्ती अजूनच मंदावते. आणि या जेवणात फळभाज्यांचे सूप / सार घ्यावीत. संपूर्ण जेवण करू नये. शक्यतो दुधी भोपळ्याचे सूप घेतले तर खूप चांगल्या पद्धतीने वजन कमी होऊ लागते. अधेमधे भूक लागल्यास भाजक अन्न जसे साळीच्या लाह्या किंवा ज्वारीच्या लाह्या, राजगिरा लाही याचे सेवन करावे तसेच, संत्रे, मोसंब, आवळा, डाळिंब अशा फळांचे सेवन करावे.     दुपारचे जेवणे , रात्रिंचे जेवण आणि जागरण न करता रात्री १०.३० ते ११ दरम्यान झोप घेणे असे नित्यनियमाने केल्यास शरीरामध्ये खूप चांगले बदल झालेले दिसतात. 


सकाळी लवकर उठून तीळतेल किंवा करंज तेल सर्वांगास लावून काही आयुर्वेदिक वनस्पतींचे चूर्ण उटणे म्हणून वापरून गरम पाण्याने स्नान केल्यास अतिरिक्त मेद झडण्यासाठी मदत होते. 


नित्यनियमाने सूर्यनमस्कार काही ठराविक योगासने  करावीत किंवा चालण्याचा व्यायाम करावा. या ऋतूमध्ये शरीरबल कमी असल्याने माफक हलका किंवा अर्धशक्ती व्यायाम करावा. 


1) सकाळी चहाऐवजी काही पेय घ्यावी. आपल्या हाताच्या बोटाच्या पेरा एवढे हळकुंड, दालचिनी व आले ठेचून याचा ३ कप पाणी घालून उकळून १ कप आटवून गाळून उपाशीपोटी घ्यावे. यामुळे अग्नी प्रदीप्त होण्यासाठी चांगली भूक व पचनासाठी , वजन कमी होण्यासाठी , जंतुसंसर्ग टाळण्यासाठी उपयोग होतो. 


2) तसेच 2 चमचे जिरे + 2 कप पाणी उकळवून १ कप करावे व गरम असताना घोट घोट घ्यावे यातील जिरे चावून खावे. 


3) कोरफड रस + आवळा रस 2-2 चमचे , अर्धा ग्लास कोमट पाणी , 6-8 थेम्ब लिंबूरस व 1 चमचा मध घालून घ्यावे या सोबतच  अश्वगंधा च्या पानांचा रस खास वजन कमी होण्यासाठी घेऊ शकतो पण  हा फार दिवस सलग घेऊ नये असे वर्णन आयुर्वेदात केले आहे. 


अशाप्रकारे आहार विहार व झोप यांचे अचूक काटेकोर पालन केल्यास वर्षाऋतूमध्ये वजन नियंत्रित होऊन शारीरिक व मानसिक स्तरावर आरोग्य राखता येते.  याबरोबरच आयुर्वेदामध्ये वजन कमी करण्याची काही खास काही औषधी चिकित्सा व  बस्तिचिकित्सा  वर्णन केले आहे. तर याचाही वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली उपयोग करता येतो