Monsoon In Maharashtra:  सर्वांचीच प्रतिक्षा संपलेली आहे. अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचं 11 जूनला महाराष्ट्रात आगमन झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावासाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात पूर्णपणे सक्रिय होणार आहे. तर बिपरजॉय चक्रीवादळही तीव्र झाले आहे. 


दक्षिण कोकणातला काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग मान्सूननं व्यापला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण कोकणातला काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग मान्सूननं व्यापला आहे. तर, संपूर्ण गोवा, कर्नाटकमध्ये मान्सून दाखल झाला. दरम्यान राज्यात पुढच्या 4, 5 दिवसात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांत तीव्र रूप धारण करणार


बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांत तीव्र रूप धारण करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.  त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणावर जाणवू शकतो. मात्र मुंबईला त्याचा फारसा धोका नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


समुद्र खवळलेलाच आहे


शनिवारी जोरदार वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात धूळ आणि वाळूचे लोट उसळले होते. त्यामुळे समुद्रही खवळला होता. रविवारी देखील समुद्र खवळलेलाच आहे. जोरजोरात लाटा उसळत आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे 700 किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला 630 किमीवर आहे. आगामी 24 तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्येही जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 


शेतकऱ्यांची पूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात


मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची पूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. बी-बियाणं आणि खतं खरेदासाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर गर्दी वाढलीय. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात 4 लाख 4 हजार 908 हेक्टर क्षेत्रावर कपाशी,ज्वारी,उडीद, मुग, तूर,तीळ पिकासह सोयाबीन पेरणीचंही नियोजन आहे.