Rain In Maharashtra: राज्यात 48 तासानी मान्सून सक्रीय होईल. तर कोकणात 13 जूनला पाऊस दाखल होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, मान्सून आधी राज्यात सात जिल्ह्यांत काल पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावली. यात कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. तर वडगाव इथे झाड कोसळून महिलेचा मृत्यू झाला. तसंच कोडसी बुद्रुक इथे रस्त्यालगतची झाडं, गावातील विजेचे खांब जमीनदोस्त झाले. या भागातील घरांची छतंही उडाली. यामुळे घरगुती सामान आणि शेतीसाठी आणलेल्या खतांचं मोठं नुकसान झालं. 


परभणी, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीच्या गंगाखेड, मानवत, सेलू तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. गंगाखेड तालुक्यातील पडेगाव हिप्परगा परिसरात वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे पेरणी पूर्वीच्या कामांना वेग येणार आहे. तर उकाड्यानं हैराण नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. 


बीडच्या माजलगाव शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. शेतक-यांच्या पेरणीपूर्ण मशागतीला वेग आला असताना, अचानक दुपारी जोरदार पाऊस बरलला. माजलगाव तालुक्यातील अनेक भागांत हा पाऊस झाला. यामुळे शेतक-यांत आनंदाचं वातावरण असून, अचानक आलेल्या पावसाने उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. 


सोलापूर येथे काही भागांत पाऊस 


सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील काही भागांत पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी शेतात मशागत करून पावसाची वाट पाहत होते. मात्र पाऊस पडला नव्हता. शनिवारी पहिल्यांदाच यंदाच्या मोसमातला पाऊस पडला असून शेतक-यांमधून समाधान व्यक्त करण्यात येतंय. या पावसाचा शेतक-यांना नक्कीच फायदा होणार आहे. 


नाशिकला वादळाचा तडाखा


नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिळकोस येथे झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे कुक्कुटपालकांचं मोठं नुकसान झालंय. तुषार सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या पोल्ट्रीचे शेड कोसळून जमीनदोस्त झालं. यात काही पक्षी मृत झालेत. पोल्ट्रीचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता होतेय. 


अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड येथे समुद्राला उधाण


बिपरजॉय चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड येथील समुद्रात लाटा उसळल्या. अलिबाग समुद्रात लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. त्यामुळे मोठ्या लाटांचे तुषार उडत होते. लाटांचा हा खेळ पाहायला पर्यटक तसंच स्थानिकांची गर्दी झाली होती. मात्र हा आनंद घेताना सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला.


रत्नागिरी शहर आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी 


रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. दरम्यान बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती कोकणातल्या वातावरणात काही बदल जाणवत आहेत. मान्सून लांबला असून किनारपट्टी भागात वारे वाहत आहेत. समुद्राला देखील उधाण आलेलं पाहायला मिळालं... तसंच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये पाऊस बसरला. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी चिपळूण शहराला झोडपलं. शुक्रवारी रात्रीही जिल्ह्यातील काही भागांत पावसानं हजेरी लावली होती.