मुंबई : ये रे ये रे पावसा रुसला का, माझ्याशी गट्टी फू केली का..., असंच सर्वजण या पावसाची वाट पाहताना म्हणत आहेत. त्यामागचं कारण म्हणजे ढगही दाटून येतायत, वातावरणही पावसासारखं होतंय, पण पाऊस मात्र बरसत नाहीये. राज्यातील काही भाग वगळता अद्यापही मान्सूनचं आगमन झालेलं नाही. त्यामुळेच आता सर्वजण मान्सूनच्या वाटचालीकडेच डोळे लावून बसले आहेत. (Monsoon rain updates konkan maharashtra kerala )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सून दोन दिवसांत कोकणात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याआधी राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनसाठी अनुकूल स्थितीमुळे मोसमी वारे दोन दिवसांत तळकोकणात दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने बुधवारी जाहीर केला. 


मोसमी पावसाने २९ मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला. अनुकूल स्थितीमुळे अतिशय वेगाने त्याने प्रवास सुरू केला आहे. त्यामुळेच मोसमी पाऊस कोकण आणि गोव्यात वेळेआधीच पोहचण्याची चिन्हं असल्याच हवामान विभागानं सांगितलं आहे. 


कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, परभणी या भागात वादळीवारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.


जालना:शहरासह जाफ्राबाद तालुक्यात पावसाची हजेरी
जालना शहरासह जाफ्राबाद तालुक्यात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उन्हाच्या कडक्यातून नागरीकांची तात्पुरती सुटका झालीय. रात्रीच्या सुमारास जालना शहरासह जाफ्राबाद तालुक्यातील काही गावांमध्ये अर्धा तास मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली.


पुण्यातील खेड आंबेगाव तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली


अमरावतीत गारपीट 
तिथे पूर्वमोसमी पावसाची सुरुवात झालेली असतानाच इथे अमरावतीत जोरदार गारपीट झाली आहे. दर्यापूरात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक एवढ्या जोरात पाऊस आला की शहरात अक्षरशः भीती पसरली होती. दर्यापुरातल्या वैभव मंगल कार्यालयात दोन लग्नसमारंभ सुरू होते. त्याचवेळी जोरदार पाऊस आल्यानं या मंगलकार्यालयाचं छतच उडून गेलं. छत उडून गेल्याने सात ते आठ वऱ्हाडी जखमी झाले. सदर घटनेनंतर जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.