Monsoon Udate : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने (Rain) गेल्या दोन दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतली आहे. पण राज्यात पुन्हा धो धो पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान खात्याने (Department of Meteorology) वर्तवली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो पुढे सरकत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत कमी दाबाचा पट्टा पश्चिम बंगालमधील गंगा नदीचे खोरं ओलांडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे पुढील चार पाच दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
देशात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा 13 टक्के अधिक पाऊस झालाय. मात्र, मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत सरासरीपेक्षा थोडा कमी म्हणजे ९२ टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलाय. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत किनारपट्ट्यांचा परिसर, ईशान्य भारतातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.. 


उजनी धरण प्लसमध्ये
दिर्घ प्रतिक्षेनंतर उजनी धरण सकाळी मायनसमधून प्लस मध्ये आलं. त्यामुळे उजनी  धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्वांना काही अंशी दिलासा मिळाला. मात्र उजनी धरण शंभर टक्के क्षमतेने भरण्यासाठी अजून 54 टीएमसी पाण्याची गरज आहे. आतापर्यंत धरणातील पाणी साठा 63.69 टीमसी झाल्याने उजनी धरण प्लस मध्ये आलंय.गेल्यावर्षी याच दिवशी उजनीत जवळपास 105 टीएमसी इतका पाणी साठा होता. त्यामानाने आज उजनीत 42 टीएमसी पाणीसाठा कमी आहे


बारवी धरण भरलं
ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे. बदलापूर जवळील बारवी धरण 100 टक्के भरलंय. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेनं भरले असून आज दुपारी बाराच्या दरम्यान धरणातील 11 पैकी 8 स्वयंचलित दरवाजे उघडले गेले. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.. धरणामध्ये 72.60 मीटर एवढी पाण्याची पातळी झाल्यास स्वयंचलित दरवाजे उघडले जातात. बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर तसच मीरा-भाईंदरच्या औद्यागिक क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणाची क्षमता 340.48 दशलक्ष लिटर इतकी आहे.