Places To Visit in Monsoon : मान्सूननं (Maharashtra Monsoon) महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावलेली असतानाच पहिल्या पावसानं एका क्षणातच जणू चमत्कार केला अगदी त्याचप्रमाणं राज्यातील काही ठिकाणं बहरून निघाली आहेत. अद्यापही राज्यातील सातारा, माळशेज पट्ट्यामध्ये अपेक्षित पावसाची हजेरी नसली तरीही तिथं विदर्भात मात्र जितक्या भागात मान्सूननं हजेरी लावली, त्या भागातील निसर्गानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भाचं नंदनवन अर्थात (Chikhaldara) चिखलदरा जंगल पावसामुळे बहरून गेलं आहे. चिखलदऱ्यातील सर्वच डोंगररांगा हिरव्यागार झाल्या आहेत. वळणवाटांचा रस्ता, वाऱ्याच्या वेगानं येणारे आणि पुढे जाणारे काळे ढग, धुकं आणि त्यातून डोकावणारी हिरवीगार वनराई, असं सुरेख दृश्य सध्या विदर्भात पाहायला मिळत आहे. 


अतिशय सुरेख अशा या मान्सून सौंदर्यामुळं मेळघाटातील या सर्व डोंगररांगा पर्यटकांना खुणावू लागल्या आहेत. इथं दऱ्याखोऱ्यांनी जणू हिरवा शालू पांघरला आहे. कोसळणाऱ्या पावसामुळं येथील हवेतही अल्हाददाक गारवा पसरला असून, आपण जणू वेगळ्या विश्वात पोहोचलो आहोत याचीच अनुभूती होत आहे. मेळघाटातील हे निसर्ग सौंदर्य प्रतिक नरेटे यांनी झी २४ताससाठी ड्रोन कॅमेरामध्ये चित्रित केलं आहे. 



पावसाच्या या दिवसांमध्ये राज्याच्या मेळघाट आणि नजीकच्या भागांमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे निसर्गाचा आनंद घेत असताना याच निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणचं प्रशासन करत असून, याच निसर्गाची अनपेक्षित रौद्र रुपं कधीही अडचणी निर्माण करु शकतात या धर्तीवर यंत्रणांनीही पूर्ण तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. 


साताऱ्यात ढगफुटीसदृश पाऊस 


दरम्यान, सध्या टप्प्याटप्प्यानं मान्सून राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये सक्रिय होत असून, याच वातावरणात साताऱ्यातील माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. माण तालुक्यातील शिंगणापूर आणि खटाव तालुक्यातील डाळमोडी घाडगे वस्ती परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे शेती वाहून गेली. या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.