किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : कोरोनाच्या धसक्यानं सारे जग हतबल झालेले असतांना कोरोनासोबतच जन्मलेले एक बाळ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुरक्षा कवचात कोरोनाशी झुंज देत आहे. विशेष म्हणजे बाळ कोरोना पॉझिटिव्ह तर आई निगेटिव्ह असल्यानं सध्या दोघांची ताटातूट झाली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एक महिला ४ मे रोजी बाळंतपणासाठी दाखल झाली होती. कोरोना चाचणीसाठी या महिलेचे नमुने पाठवण्यात आले होते.  पण रिपोर्ट येण्या अगोदरच महिलेने मुलाला जन्म दिला. 
 
महिलेचे रिपोर्ट न आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बाळाचे ही नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले. रिपोर्टमध्ये  बाळ कोरोना पॉझिटिव्ह तर आई निगेटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर  पाच दिवसांच्या या बाळाला एक स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले आहे. मातेची आणि बाळाची झालेली ही ताटातूट सुरुवातीला जिल्हा रुग्णालयातील सगळ्यांचेच काळीज पिळवटून टाकत होती. पण रुग्णालयाचे डॉक्टर तसेच परिचारिका यांनी बाळाच्या पालकांना धीर दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बाळाची सर्वोतोपरी काळजी रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टर घेत आहेत. एवढचं नाही तर आई आणि बाळाचा व्हाट्सऍपच्या माध्यमातून संवाद घडवून आणत आहेत. यासंबंधीत  डॉ. निलेश जेजुरकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 'बाळाच्या परिस्थित सुधारणा होत आहे. त्याचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहे. ' त्यामुळे बाळाची लवकरच कोरोनाच्या विळख्यातून सुटका होईल अशी आशा देखील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.