माय लेकाचं अतूट नातं! मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही तासाभरात सोडले प्राण

तासाभराच्या अंतराने मायलेकाचा मृत्यू झाला आहे. माय लेकावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ या कुंटुंबावर आली आहे.
Pune News : माय लेकाचं नातं हे अतूट असतं असं म्हणतात याची प्रचिती आणणारा घटना प्रत्यक्षात घडली आहे. माय लेकाचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही तासाभरात प्राण सोडले आहेत. पुण्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या माय लेकाला एकाचवेळी अग्नी देण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. हे दृष्य पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावले.
दौंड तालुक्यातील डाळिंब येथे ही घटना घडली आहे. आई आणि मुलाचे एक तासाच्या अंतराने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे. या घटनेने डाळिंब, उरुळी कांचनसह परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.
आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुलगा जमिनीवर कोसळला
कृष्णाबाई आत्माराम म्हस्के (वय 75 वर्षे) आणि राजेंद्र आत्माराम म्हस्के (वय 62 वर्षे) अशी मृत माय लेकाची नावे आहेत. कृष्णाबाई म्हस्के यांना तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यामुळे त्यांना तात्काळ उरुळी कांचन येथील सिध्दीविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्या उपचाराला प्रतिसादही देत होत्या. रविवारी सकाळी साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णाबाई यांचा मुलगा राजेंद्र म्हस्के हे काम करीत असताना अचानकपणे जमिनीवर कोसळले. राजेंद्र म्हस्के यांना तात्काळ उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
तासाभरात मायलेकाचा मृत्यू
राजेंद्र यांच्या मृत्यूनंतर एक तासाच्या अंतराने त्यांच्या मातोश्री कृष्णाबाई यांचेही सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. दरम्यान, आई व मुलाचा एका तासाच्या अंतरानेच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दोघांच्या पार्थिवावर डाळींब बन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकाच वेळी भावी पती-पत्नीचा मृत्यू
पुण्यात चौथ्या मजल्यावरुन पडून तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान तरुणीच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या भावी पतीनंही आत्महत्या केली. एकाच वेळी भावी पती-पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली.