धक्कादायक, आईला कोरोना झाला म्हणून २३ वर्षीय मुलाची आत्महत्या
आईला कोविड-१९ची लागण झाली म्हणून तिच्या २३ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
नाशिक : आईला कोविड-१९ची लागण झाली म्हणून तिच्या २३ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड उपनगर परिसरातील रोकडोबावाडी येथे घडली. आईला बघून आल्यावर नैराश्येपोटी घरात मुलाने गळफास शुक्रवारी मध्यरात्री घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे, ठाणे, मुंबईनंतर नाशिकमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णांमुळे नागरिक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वैद्यकीय तज्ज्ञांसमवेत नाशिकचा दौरा करणार आहेत.
आईला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मुलगा नैराशात गेला होता. त्यातच तो आईला पाहण्यासाठी रुग्णालयात गेला. आईला पाहून घरी परतल्यानंतर मुलाने नैराश्येपोटी घरात गळफास घेऊन जीवन संपवले, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, नाशिक शहरासह ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
जिल्ह्यात दिवसभरात तब्बल ६१५ जणांना करोनाची बाधा झाली तर सहा जणांनाही बळी गेला. नाशिक मनपा क्षेत्रात ४०७ रुग्ण असून महानगरातील ५ जणांसह ग्रामीणमधील एक अशा ६ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३७१ वर पोहोचली आहे. नाशिक महानगराने प्रथमच एकाच दिवसात झालेल्या बाधितांमध्ये ४००चा आकडा ओलांडला, तर नाशिक ग्रामीणमध्ये १५१, मालेगावचे ७ आणि जिल्हाबाह्य ४३ जणांना बाधा झाल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार ७३९ वर पोहोचली आहे.