अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका वाहतुकीला बसला आहे. महाड ते विन्हेरे मार्गावर कुर्ला धरणाजवळ आज सकाळी डोंगराचा एक भाग खाली आहे. डोंगर मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने हा मार्ग  वाहतुकीसाठी बंद झाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाड परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला आहे. बुधवारी रात्री महाड विन्हेरे रस्त्यावर कुर्ला धरणाच्या जवळ दरड कोसळली होती.  सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी चा वापर करून रस्ता मोकळा केला होता मात्र आज सकाळी पुन्हा त्याच ठिकाणी माती रस्त्यावर आली.  यामुळे विन्हेरे विभागातील २५ गावांचा महाड शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱयांनी आता हा ढिगारा उपसण्याचे काम हाती घेतले आहे.


दरम्यान, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल चांगला पाऊस झाला. दरम्यान, चक्रीवादळाने तडाखा बसलेल्या काही गावात अजूनही अंधार आहे. येथील विद्युत खांब आणि तारा बदलण्यात आल्या नसल्याने ग्रामस्थ अंधारात आहेत. त्यातच पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.