खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेला शब्द पाळला, बैलगाडा शर्यतीत घोडीवर `स्वार`
निमगावात भिर्रर...निमगाव खंडेराय यात्रेत बैलगाडा शर्यत, बैलगाडा मालकांमध्ये उत्साह
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बैलगाडा मालकांना दिलेला शब्द पूर्ण केला. खेड तालुक्यातील निमगाव धावडीच्या खंडोबा यात्रेत बैलगाडा घाटात खासदार डॉक्टर कोल्हे बैलगाड्या समोर घोडी धरली. खासदार बैलगाडा घोडीवर बसणार असल्याने बैलगाडा मालकांमध्ये वेगळा उत्साह पहायला मिळत होता.
आज माघ पौर्णिमे निमित्त पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव खंडेरायाचा यात्रा उत्सव संपन्न होत असून यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आलं आहे. बैलगाडा शर्यती मुळे येथील पर्यटनाला अर्थकारणाचा चालना मिळाली आहे. आज या बैलगाडा घाटात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे बैलगाडा घाटात घोडीवर स्वार होऊन मतदारांना बैलगाडा मालकांना दिलेला शब्द पाळला.
खासदार अमोल कोल्हे यांची भावना
निवडणूक काळात बैलगाडा मालकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी खासदार अमोल कोल्हे खंडोबा यात्रेत पोहचले. आनंदाची भावना आहे, सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा प्रेमींची बैलगाडा मालकांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूचा हा निकाल दिल्यानंतर देवाच्या दारात होणार हा पहिला घाट आहे.
माघी पोर्णिमेच्या निमित्ताने होणारी सर्वात मोठ्या यात्रांमधील एक यात्रा आहे, मी जसा शब्द दिला होता, त्याप्रमाणे देवाच्या दारात घोडीवर स्वार झालो, अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
बैलगाडा शर्यत हा श्रेयवादाचा मुद्दा नाही, हा विषय बैलगाडा मालकांच्या बैलगाडा प्रेमींच्या आणि शेतकऱ्यांच्या आनंदाचा विषय आहे, त्यामुळे तू तू मै मै करण्यापेक्षा ही बैलगाडा शर्यत राष्टीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी नेता येईल आणखी लोकप्रिय कशी करता येईल त्यामाध्यमातून पर्यटनाला कशी चालना देता येईल, आपल्या संस्कृतीचं संवर्धन करता येईल, त्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारणाला गती कशी देता येईल, यादृष्टीने प्रयत्न करणं जास्त महत्त्वाचं आहे, असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.