अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राणा यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राणा यांच्या कुटुंबातील जवळपास १० जणांना coronavirus कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनीत राणा यांच्या कुटुंबीयांपैकी कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये त्यांचा ४ वर्षांचा मुलगा रणवीर आणि ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. शिवाय त्यांच्या सासू- सासऱ्यांनाही या विषाणूचा संसर्ग झाला आगे. ज्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. 


नवनीत राणा यांच्या सासऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळताच जवळपास ५० ते ६० जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय राणा यांच्या निवासस्थानासह आजूबाजूच्या परिसराचं निर्जंतुकीकरणही करण्यात येणार आहे. 



दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमरावतीमध्ये तरुणीच्या गुप्तांगातून कोरोना चाचणीसाठीच स्वॅब नमुने घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. ज्यानंतर नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला होता. पीडितेला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा थेट इशाराही त्यांनी दिला होता. अमरावती येथील आरोग्य यंत्रणा ढासळल्याची बाब अधोरेखित करत त्यांनी कोविड चाचणी करणाऱ्या व्यक्तींची पार्श्वभूमी पडताळून पाहिली पाहिजे असा आग्रही सूर आळवल्याचं पाहायला मिळालं होतं.