मुंबई : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. आज दुपारी मुंबईत ही भेट होणार आहे. आगामी लोकसभेसाठी साता-यातील उमेदवारी वरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कलह निर्माण झाला आहे.


या पक्षांमधून ऑफर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत एका गटानं उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर उदयनराजे अस्वस्थ झाले आहेत. याच दरम्यान त्यांना भाजपसह नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभीमानी पक्ष आणि रामदास आठवले यांनी देखील आरपीआय पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे.


मुख्यमंत्र्याची भेट घेणार


या सगळ्या परिस्थितीत आज उदयनराजे मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत. त्यामुळं ही भेट नक्की कशासाठी याबाबतच्या चर्चेला उधाण आलेले आहे. राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या बैठकीनंतर सर्वच पक्षांमध्ये आपले मित्र आहेत असं सूचक वक्तव्य देखील उदयनराजेंनी केलं आहे.


साताऱ्यात उमेदवारी कोणाला?


आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेकांना उत्सूकता आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या आढावा बैठका सुरू आहेत. रविवारी सातारा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली.


खासदार उदयनराजे भोसले यांची काही वक्तव्य राष्ट्रवादीला अडचणीची ठरत आहेत. उदयनराजे भोसले हे कोणाला जुमानत नसल्याने पक्षात त्यांच्याबद्दल नाराजी आहे.