सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या सदाशिव कटके यांना अपघातात दोन्ही हात गमवावे लागले आहेत. पण यापेक्षाही मोठा धक्का त्यांना महावितरण कंपनीनं दिलाय. महावितरणसोबत गेली २० वर्षं काम करत असलेल्या सदाशिव कटके यांच्या अपघातानंतर, महावितरणने सरळ हात झटकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या खंडाळे गावातल्या एमएसईबी सबस्टेशनमध्ये बाह्यसूत्र वायरमन म्हणून काम करणाऱ्या सदाशिव कटके यांना शॉक लागून आपले दोन्ही हात गमवावे लागले. गेल्या २० वर्षांपासून ते वीज महामंडळाचे 'झिरो वायरमन' म्हणून काम करत आहेत. मागील वीस वर्षांपासून वीज वितरण कंपनीमध्ये काम करणाऱ्या सदाशिव कटके यांच्याकडे त्याचा काहीही पुरावा नाही. त्याचाच गैरफायदा महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आता अपघातानंतर घेत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. 
 
सध्या पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार घेत असलेले सदाशिव कटके आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. दरम्यान, कटके यांच्या अपघाताची चौकशी करुन, अहवाल आल्यानंतर मदत देण्याचं आश्वासन अधीक्षक अभियंता पी पडळकर यांनी दिलंय. 


असे अनेक कटके महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात महावितरणबरोबर काम करताहेत. राज्याची विजेची गरज ते भागवत आहेत. मात्र महावितरण त्यांच्याकडे पाहायलाही तयार नाही.