एसटीच्या ताफ्यात 3500 बसेस येणार; मुंबई-पुणे, नाशिक-संभाजीनगर, नागपूर-अमरावती मार्गावरील प्रवाशांना दिलासा
MSRTC to add 3500 Buses : मुंबई-पुणे, नाशिक-संभाजीनगर, नागपूर-अमरावती मार्गावरील प्रवाशांची चिंता मिटणार आहे. एसटीच्या ताफ्यात 3500 बसेस दाखल होणार आहेत.
MSRTC to add 3500 Buses : मुंबई-पुणे, नाशिक-संभाजीनगर, नागपूर-अमरावती मार्गावरील प्रवाशांची चिंता मिटणार आहे. एसटीच्या ताफ्यात 3500 बसेस दाखल होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात 3 ते साडे तीन हजार नव्या एसटी बसेस आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ST महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. तर, एसटी चालक हेडफोन लावून किंवा मद्यपान करुन गाडी चालवत असल्यास तात्काळ कारवाई करणार असल्याचंही गोगावले म्हणाले.
दोन ते तीन वर्षांपूर्वी MSRTCच्या ताफ्यात जवळपास 18,500 बसेस होत्या. ज्यापैकी 15,500 बसेस सेवा देत होत्या, दररोज 65 लाख प्रवासी एसटी बसने प्रवास करत होते. मात्र, कोविडनंतर बसेस खराब होणे आणि नवीन बसेसची टंचाई यामुळे जवळपास 1,000 बस कमी झाल्या. सध्या फक्त 14,500 बसेस सेवा देत आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या 65 लाखांवरून 54 लाखांपर्यंत घटली आहे.मागणी असूनही बसेसची टंचाई असल्याने MSRTCला अनेक वर्षे तोट्याचा सामना करावा लागला.
दोन वर्षांपूर्वी उचललेल्या उपाययोजनांनंतर MSRTCने आता आपल्या ताफ्यात भाडेतत्त्वावर 1300 नवीन बसेस सामील करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत मुंबई-पुणे क्षेत्रासह नाशिक-संभाजीनगर आणि नागपूर-अमरावती यासारख्या प्रत्येक विभागासाठी सुमारे 450 बसेस सेवेत समाविष्ट केल्या जातील.
या नवीन बसेस नवीन वर्षापासून सेवेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे MSRTCला आपला तोटा भरून नफा मिळवण्याची अपेक्षा आहे. फक्त एसटी महामंडळालाच नाही तर राज्यातील एसटी सेवांचा वापर करणाऱ्या गरीब जनतेलाही याचा फायदा होणार आहे. यामुळे प्रवास परवडणारा होईल आणि महागाईचा फटका कमी बसेल. म्हणूनच, MSRTCकडून राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे नववर्षाचे खास गिफ्ट ठरणार आहे.