एकनाथ खडसेंच्या लाडूतुलेनंतर गोंधळ, लाडू हिसकावून खाण्यासाठी तोबा गर्दी; 2 मिनिटात सर्व फस्त
Eknath Khadse Ladoo Comparison Program: लहान मुले, तरुण, म्हातारी माणसे सर्वजण आपले वय, सामाजिक भान विसरुन लाडूवर तुटून पडले होते. लाडूतुला झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांत सर्व लाडू होत्याचे नव्हते झाले.
Eknath Khadse Ladoo Comparison Program: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त त्यांचे कार्यकर्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यावेळीदेखील खडसेंच्या कार्यकर्त्यांनी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांची लाडू तुला करण्यात आली. मात्र वेगळाच प्रकार समोर आला.
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंची लाडू तुला करण्यात आली. यानंतर मात्र कार्यक्रम स्थळी एकच गोंधळ उडला. लाडू हिसकावून खाण्यासाठी तोबा गर्दी केलेली पाहायला मिळाली.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांतर्फे एकनाथ खडसे यांची लाडूतुला करण्यात आली मात्र लाडूतुला झाल्यानंतर लाडू घेण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली असून त्या ठिकाणी एकच झुंबड उडाली होती. लाडू मिळावा म्हणून नागरिकांसह लहान मुलांनी जीवाचे रान करून लाडू घेण्यासाठी प्रयत्न केले.
लहान मुले, तरुण, म्हातारी माणसे सर्वजण आपले वय, सामाजिक भान विसरुन लाडूवर तुटून पडले होते. लाडूतुला झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांत सर्व लाडू होत्याचे नव्हते झाले. तराजू रिकामी झाला. माणसं पांगली गेली. कार्यक्रम स्थळी कोणीच उरलं नाही. सर्वांनी मिळून लाडू फस्त केले होते. कोणी खिशात भरले, कोणी दोन हात भरुन घेतले तर कोणीच पूर्ण बॉक्स घेऊनच पळाले.
मुक्ताईनगर येथील खडसेंच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन चर्चेचा आणि हास्याचा विषय बनत चालले आहे.
पाच वर्ष वाया गेली
शरद पवारांचं न ऐकल्यामुळे आपली पाच वर्ष वाया गेल्याचीही कबुली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये बोलताना दिली आहे. भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी घ्यावी अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण त्यावेळी त्यांचं ऐकलं नाही असे खडसे म्हणाले. आणि हीच आपली मोठी चूक झाल्याचेही त्यांनी सांगितले.