खडसेंना प्रवेश देताना विचारात न घेतल्याने `हा` आमदार नाराज
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज
मुंबई : एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंद सुरुय तर शिवसेनेसाठी हा निर्णय भविष्यात संघर्षाचा ठरु शकेल अशी चिन्ह दिसत आहेत. खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले आहेत. मुक्ताईनगर येथील निवडणूक लढून ते विजयी झाले होते. मी एकनाथ खडसे यांच्या मुलीला हरवून विजयी झालो आहे आणि महाविकास आघाडीत असतानाही खडसे यांना प्रवेश देताना मला विचारात घेतले नाही त्यामुळं नाराजी असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
खडसे भाजपात असताना त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. आमच्या तोंडी फेस आणलाय. आमच्यावर अन्याय केला आणि आता तेच पक्षाकडून अन्याय झाल्याची भाषा करतायत असेही पाटील म्हणाले.
आता जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले चालले आहे. ते आता खडसे आल्यामुळं व्यवस्थित चालेल असं वाटत नाही असेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर त्यांनी खोटे गुन्हे नोंदवले आहेत. त्यामुळे कटुता लगेच संपेल असं वाटत नाही. त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी असल्याचे पाटील म्हणाले.