मुंबई : सोमवारी मुंबई आणि उपमगरांमध्ये चांगलाच उकाडा जाणवत होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे डोळे आभाळाकडेच लागून राहिले होते. अरे बाबा आता तरी ये, असं म्हणत प्रत्येकजण मान्सूनला जणू आर्जव करत होता. (Monsoon Update )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायंकाळी पावसाचे ढग मुंबई आणि उपनगरीय भागांना झाकोळून गेले आणि तळपता सूर्यही त्या ढगांच्या आड गेला. आता पाऊस येईल... असं वाटत असतानाच या ढगांनी चकवा दिला. अखेर मंगळवारी पहाटे मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. 


वांद्रे ते परळ भागात मंगळवारी रिमझिम पाऊस सुरु झाला. शिवाय भांडुप घाटकोपरदरम्यानही पावसाच्या सरी बरसल्या. पण, हा मान्सून नसल्याचीच माहिती हवामान खात्यानं स्पष्ट केली. 


रिमझिम पावसाला मान्सून समजण्याची चूक तुम्ही करत असाल, तर थांबा. कारण, हा मान्सून नाही. सध्या संपूर्ण MMR परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळं उकाड्यानं हैराण मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. 


मुंबई, ठाणे, पालघर, डहाणू पुणे जिल्ह्याचा काही भाग, नाशिक जिल्ह्याचा औरंगाबाद या भागात दिवसा ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल असं उपग्रहावरून छायाचित्रांच्या आधारे भारतीय हवामान विभागाच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. 


तसंच नागपूर चंद्रपूरमध्येही ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.