`मृत्यूच्या 15 मिनिटं आधी ती...`; पवईतील 25 वर्षीय पायलेटच्या नातेवाईकांचा दावा! BF चा उल्लेख
Air India Pilot Srishti Tuli Death Case: मुंबईतील पवईमध्ये वास्तव्यास असलेल्या या 25 वर्षीय महिला तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा दावा केला जात असतानाच आता एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
Air India Pilot Srishti Tuli Death Case: मुंबईमधील पवई येथे एअर इंडियाच्या एका 25 वर्षीय महिला वैमानिकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मरण पावलेल्या तरुणीने डेटा केबलने गळा आवळून आत्महत्या केल्याचा दावा केला जात असतानाच या प्रकरणामध्ये काही धक्कादायक दावे मृत तरुणीच्या कुटुंबियांनी केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रियकराने छळ केल्याचा आरोप
मरण पावलेल्या तरुणीचं नाव सृष्टी तुली असं आहे. सृष्टीने आत्महत्या केल्याचा दावा केला जात असला तरी तिच्या नातेवाईकांना हा दावा मान्य नाही. सृष्टीची हत्या करण्यात आल्याची शंका उपस्थित करतानाच तिचा प्रियकर आदित्य पंडितने तिचा छळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच सृष्टीचा मृत्यू झाल्याची बातमी कळण्याच्या 15 मिनिटांपूर्वीच ती तिच्या आईशी आणि काकूबरोबर फोनवर बोलत होती असा खळबळजनक दावा नातेवाईकांनी केला आहे.
मृत्यूच्या 15 मिनिटं आधी...
"पोलीस म्हणतात की तिने आत्महत्या केली. मात्र त्याने (तिच्या प्रियकराने) असं काय केलं की तिने आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचली?" असा सवाल सृष्टीच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर सृष्टीचे काका विवेक तुली यांनी 'एनडीटीव्ही'शी बोलाताना, तिच्या मृत्यूची बातमी मिळण्याच्या काही मिनिटांआधी ती तिच्या आईशी बोलल्याचं सांगितलं. "ती अगदी उत्साहाने तिच्या आई आणि काकूशी बोलली. त्यानंतर 15 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. हे कसं काय शक्य आहे? तो (तिचा प्रियकर) तिला असं काय म्हणाला? त्याने तिच्याबरोबर काय केलं? पोलीस याचा तपास करत आहेत," असं विवेक यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामुळे तुली यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आदित्यला अटक केली असून आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
आदित्यने काय दावा केला आहे?
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय आदित्यने चौकशीदरम्यान तो सोमवारी रात्री तो फरिदाबादला जाण्यासाठी त्याच्या कारमधून निघाला असता काही वेळाने त्याला सृष्टीने फोन करुन आपण आत्महत्या करत असल्याचं सांगत फोन केला. तो पुन्हा सृष्टीच्या घरी आला तेव्हा दरवाजा आतून बंद होता. आदित्य आणि सृष्टीबरोबरच महिला सहकाऱ्याने चावी बनवणाऱ्याला फोन करुन बोलावलं आणि दरवाजा उघडून घेतला. घरात प्रवेश केल्यानंतर सृष्टीने डेटा केबलने गळा आवळून आत्महत्या केल्याचं दिसून आल्याचा दावा आदित्यने केला आहे. सृष्टीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. सृष्टी राहत असलेल्या भाड्याच्या घरामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही.