Weather Update Maharashtra: ऑक्टोबर हिटच्या तीव्र झळांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. शनिवारी मुंबईत कमाल तापमानाने उसळी घेतली होती. शनिवारी मुंबईच्या कमाल तापमान 37 अंशापार पोहोचले होते. उन्हाच्या काहिलीमुळं अनेक नागरिक हैराण झाले होते. तर, यंदाचा ऑक्टोबर अधिक उष्ण असल्याचे भाकित हवामान विभागाने आधीच वर्तवले होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कोकण विभागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. तसंच, मुंबईच्या हवेतून आर्द्रता कमी झाली असून शनिवारी दिवसभर मुंबईकरांना उन्हाचे चटके सोसावे लागते होते. दरम्यान शनिवारी नोंदवले गेलेले तापमान हे या हंगामातील सर्वोच्च तापमान ठरले आहे. एका दशकात ऑक्टोबर महिन्यात नोंदवलेले तिसऱ्यांदा उच्च तापमानाची नोंद झाली आहे. 


2018मध्ये, ऑक्टोबर महिन्यातील 29 तारखेला कमाल तापमान 38 अंश नोंदवले होते. तर 2015 मध्ये, 17 ऑक्टोबर रोजी दिवसाचे तापमान 38.6 अंशांवर पोहोचले होते. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळं आणि अरबी समुद्रात तयार झालेले तेज चक्रीवादळ हेदेखील तापमानात वाढ होण्यात कारणीभूत ठरले होते. 


हवामान विभागाने आपल्या पाच दिवसांच्या अंदाजात म्हटले आहे की, पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहिल. त्यामुळं पुढच्या आठवड्यातही किमान तापमान चढेच राहण्याची शक्यता आहे. वाढलेल्या तापमानामुळं मुंबईकरांना डोळे चुरचुरणे, डोकेदुखी, डिहायड्रेशनसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. 


दरम्यान, शविवारी सांताक्रुझ येथे 1.5 अंशानी तापमान सरासरीपेक्षा तब्बल 3.5 अंशांनी अधिक होते. MD कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेली आर्द्रता पातळी अनुक्रमे ५८% आणि ७२% होती. उत्तर-पश्चिम गुजरातमधील सततच्या चक्रीवादळामुळे दिवसा तापमानात वाढ होतेय तसंच, अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या वाऱ्यांना विलंब होत असल्याने तापमानात वाढ झाली आहे. सामान्यत: समुद्री वारे दुपारी 1 वाजेपर्यंत वाहण्याची अपेक्षा असते, परंतु शनिवारी उशीर झाला, परिणामी तापमानात वाढ झाली, असं हवामान विभागाने म्हटले आहे.