अरूण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वसूल होणाऱ्या टोल संदर्भातील आकडेवारीमध्ये मोठा घोटाळा असल्याचं समोर आलंय. त्यामुळे ही टोल वसुली थांबवण्याची मागणी पुण्यातील 'सजग नागरिक मंचा'ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीचे कंत्राट २००४ मध्ये १५ वर्षांसाठी कंत्राटदाराला दिले गेले, ज्याची मुदत ९ ऑगस्ट २०१९ ला संपली आणि त्यानंतर १० ऑगस्ट २०१९ पासून तात्पुरते कंत्राट करून नवीन कंत्राटदाराला हे टोलवसुली कंत्राट देण्यात आलंय. प्रत्येक टोलनाक्यावरून दर महिन्याला किती वाहने धावली तसेच त्यांच्याकडून किती टोल जमा झाला याची माहिती MSRDC च्या वेबसाईटवर प्रसिद्ध होते. या वेबसाइटवरील माहिती डोके चक्रावणारी आहे.


एमएसआरडीसीच्या वेबसाईटवरील धक्कादायक माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिल ते जुलै २०१९ ची आकडेवारी


- महामार्गावर १ कोटी ७२ लाख ५० हजार ३९१ वाहनं धावली


- सरासरी ४३ लाख वाहने प्रति महिना


- सरासरी ६० कोटींची टोलवसुली


सप्टेंबर २०१९ ची आकडेवारी


- १६.९० लाख वाहनं धावल्याचं दाखवण्यात आलंय


- सर्व वाहनांकडून ५९.७० कोटी टोल वसुली केल्याचं नमूद


नवीन कंत्राटदाराने ऑक्टोबर २०१९ ची आकडेवारी दिली


- ऑक्टोबर महिन्यात १९ लाख  वाहनं धावल्याचं दाखवण्यात आलं


- ६७ कोटी रुपये टोल जमा


नोव्हेंबर २०१९ ची आकडेवारी


- नोव्हेंबरमध्ये १९.३४ लाख वाहनं धावली


- ७१ कोटी रुपये टोल जमा


यामध्ये सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या या रस्त्यावरून धावलेल्या वाहनांच्या संख्येत तिपटीचा फरक असूनही कमी वाहनसंख्या दाखवणाऱ्या कंत्राटदाराने १५ टक्क्यांपेक्षा जास्त टोल जमा झाल्याचे दाखवलंय. नवीन कंत्राटदाराने दाखवलेली वाहनसंख्या आणि टोल स्वरूपात जमा झालेली रक्कम यामध्येही तीन महिन्यात मोठी तफावत आहे, असं सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दाखवून दिलंय. 



नवीन सरकारने लक्ष घालून गौडबंगालाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केलीय. तोपर्यंत मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील टोल वसुली स्थगित ठेवावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलीय.