Mumbai Ghatkoper Hording Collapse: मुंबईमधील घाटकोपरमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग पेट्रोल पंपवर पडून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 74 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं असून अनेकांवर घाटकोपरमधील राजावडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आता या होर्डिंग प्रकरणावरुन मुंबई महानगरपालिका आणि भारतीय रेल्वेदरम्यान जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्या जमीनीवर होर्डिंग उभं होतं ती जमीन कोणाच्या मालकीची आहे यावरुन वाद सुरु झाला आहे.


महानगरपालिकेचं म्हणणं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरपालिकेने अपघातग्रस्त होर्डिंग ज्या जमीनीवर उभं होतं ती जमीन आपल्या मालकीची नसल्याचं सांगत हात वर केले आहेत. ही जमीन रेल्वे पोलिसांच्या अख्त्यारीत येत असल्याचा दावा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. तसेच मुंबई महानगर पालिका रेल्वे विरुद्ध गुन्हा दाखल करणार असून जाहिरात कंपनीविरुद्धही गुन्हा दाखल केला जाईल असं जाहीर केलं आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


मध्य रेल्वेने नेमकं काय म्हटलंय?


मात्र महानगरपालिकेने हे स्पष्टीकरण दिल्यानंतर मध्य रेल्वेने या जागेची मालकी आपल्याकडे असल्याचा दावा फेटाळला आहे. अपघातग्रस्त होर्डिंग रेल्वेच्या जागेवर नव्हतं असं मध्य रेल्वेने म्हटलं आहे. "हे होर्डिंग रेल्वेच्या जमीनीवर नव्हतं. या प्रकरणाशी भारतीय रेल्वेचा कोणताही संबंध नाही," असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेने एक्सवरुन (ट्वीटर) पोस्ट केलं आहे.



वर्षभरापूर्वीच दाखल करण्यात आलेला FIR


मुंबई महापालिकेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 डिलेंबर 2021 रोजी जीआरपी कमिशन कार्यालयामधून ही बेकायदेशीर होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचा दावा केला असल्याचं वृत्त न्यूज 18 ने दिलं आहे. सात ते आठ झाडं कापून हे होर्डिंग लावण्यात आलं. या प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिकेने पहिली एफआयआर 2023 साली मे महिन्यामध्ये दाखल करण्यात आल्याचा दावाही केला. पंत नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. या ठिकाणी 40 बाय 40 फुटांच्या होर्डिंगची परवानगी दिली जाते. मात्र जे होर्डिंग पडलं ते 120 बाय 120 स्वेअर फुटांचं होतं, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता या अपघातानंतर एन वॉर्डच्या कमिशनरने तातडीने जाहिरात कंपन्यांना या भागातील बेकायदेशीर होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहेत.


नक्की वाचा >> घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळ


6 कोटी 13 लाखांचा दंड


मुंबई महानगरपालिकेने अपघात झाल्याच्या दिवशी हे होर्डिंग लावणाऱ्या 'इगो मिडीया' कंपनीला होर्डिंग बेकायदेशीर असल्याची नोटीस पाठवली होती. कंपनीला 6 कोटी 13 लाखांचा दंड भरण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले होते. तर दुसरीकडे रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'इगो मिडीया' कंपनी आधीच काळ्या यादीत टाकण्यात आली आहे.