Mumbai Goa Highway Traffic Problem : मुंबई-गोवा महामार्ग सातत्याने वादात असतो. दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. आता पहिल्याच पावसाचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला फटका बसला आहे. लांजा तालुक्यातील वाकेड इथे रस्ता खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीत संध्याकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला पहिल्या पावसातच फटका बसला आहे. लांजा तालुक्यातील वाकेड या ठिकाणी रस्ता खचल्याचा प्रकार घडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक कामे हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले आहे. हा रस्ता खचल्याने अनेक वाहने आपटून त्याच्या बंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


मोठा अनर्थ टळला


लांजा तालुक्यातील वाकेड घाटीत महामार्गाचे काम जोरात सुरु आहे. घाटात सुरु असलेल्या डोंगर खोदकामामुळे रस्त्याची गटारे बुजली आहेत. त्यामुळे मुख्य रस्ता धोकादायक बनला आहे. यातच रस्त्यालगत मातीचे ढिगारे असल्याने मातीही रस्त्यावर येत आहे. त्यातच बुधवारी कोसळलेल्या पावसाने पाण्याचा निचरा न झाल्याने वाकेड घाटातील वळणावरील एक मोरी खचली. ही खचलेली मोरी एका वाहन चालकांच्या लक्षात आली, म्हणून पुढील फार मोठा अनर्थ टळला. यामुळे वाहतूक तात्काळ पूर्णत: थांबवण्यात आली. 


तब्बल दोन तास ही वाहतूक ठप्प होती. यानंतर महामार्गावरील ठेकेदाराची यंत्रणा घटनास्थळी पाचारण करण्यात आली. लांजा तालुक्यातील वाकेड गावातील ग्रामस्थ रस्त्यावर उभे राहून वाहन चालकांना रस्ता खचल्याच्या सूचना करत आहेत.  


युद्ध पातळीवर काम सुरु


या काळात स्थानिक ग्रामस्थांनी मोलाची भूमिका बजावली. या रस्ता खचलेल्या भागात भराव टाकून रस्ता पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यानंतर एका बाजूने लहान वाहने सोडण्यात आली. तर मोठी वाहने हे रस्त्याच्या दुतर्फा थांबवण्यात आले. यानंतर रात्री आठच्या सुमारास खचलेल्या भागाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.