`मुंबई - गोवा महामार्गावर पडलेले सर्व खड्डे ११ सप्टेंबरपर्यंत भरणार`
मुंबई - गोवा महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यात आले आहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा कोकण दौऱ्यावर
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यात आले आहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा कोकण दौऱ्यावर आलेत. सकाळी ७ वाजता चिपळूण इथून त्यांच्या या पाहणी दौऱ्याला सुरवात झाली. यावेळी त्यांनी सर्व खड्डे ११ सप्टेंबरपर्यंत भरणात असल्याचे जाहीर केले. दरम्यान, सर्व खड्डे संपल्याचा दावाही त्यांनी केलाय. त्यामुळे खरच मुंबई-गोवा महामार्गावचे खड्डे संपलेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठिकठिकाणी उतरून अधिकारी तसेच काम करत असलेल्या ठेकेदारांना काही सूचना केल्या. दरम्यान या खड्डे भरण्याच्या कामाबाबत आपण समाधानी असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पावसामुळे भरलेले खड्डे पुन्हा पडतायत. मात्र ११ सप्टेंबरपर्यंत सर्व खड्डे भरले जातील असा दावा पाटील यांनी केलाय.
गेल्या आठवड्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-कणकवली या रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला. या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिशय समाधानकारक काम केलं आहे. आरवली-संगमेश्वर दरम्यानचे रस्त्याचे काम गणपती पूर्वी पूर्ण होईल. मुंबई - गोवा महामार्ग डिसेंबर २०१९ पर्यंत बहुतांश पूर्ण होईल. येत्या गणेशोत्सवाचे निमित्ताने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा वाढणारा अतिरिक्त ताण विचारात घेऊन या महामार्गावरील खड्डे तात्काळ भरून तो सुस्थितीत करण्याबाबत गेल्या आठवड्यात सर्व संबंधितांना सक्त सूचना दिल्या होत्या, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.