शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून `महायुती`मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?
MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून `महायुती`मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
MLC Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या (Teachers Constituency Election) निवडणुकीवरुन खटके उडताना दिसत आहे. विधान परिषदेच्या दोन पदवीधर तसंच दोन शिक्षक अशा चार मतदार संघासाठी 26 जूनला मतदान होणार आहे. यासाठी महायुतीच्या जवळपास सर्व पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी दर्शवली आहे.
मुंबई पदवीधर मतदार संघातही चुरस
अगदी मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर याच जागेसाठी राज ठाकरेंचा मनसे पक्षाकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आलीय. आता यात भर पडली आहे ती भाजप आणि शिंदे गटाची. शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दावा केला आहे. तसंच भाजपासुद्धा या जागेवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटही आपला उमेदवार उभा करणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. आता वेळच सांगेल की या महायुतीमध्ये एकी होते की हे एकमेकांसमोर उभे ठाकतात.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार ॲड अनिल परब उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबईतील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार अरविंद सावंत, अनिल देसाई, अमोल कीर्तिकर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेस लोकसभा उमेदवार भूषण पाटील तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, आमदार, खासदार उपस्थित असणार आहेत.
दुपारी 12 वाजता अनिल परब हे कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे उमेदवारी दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यावेळी तीन हजार शिवसैनिक, युवसैनिक तसंच पदवीधर मतदार उपस्थिती असणार आहेत. दरम्यान डॉ. राजेंद्र विखे पाटील नाशिक शिक्षक मतदार संघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कधी आहे मतदान आणि निकाल?
विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जूनला सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान असणार आहे. तर 1जुलैला मतमोजणी होणार असून निकाल लागणार आहे.