मुंबई : सीडीआरप्रकरणी आरोपी असणाऱ्या रिझवान सिद्दीकीला तुरुंगातून मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे रिझवानला मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान, सीडीआर प्रकरण नेमकं आहे तरी काय? आणि सिने तारेतारकांचा याच्याशी काय संबंध? एक रिपोर्ट.


बॉलिवूड कनेक्शन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझवान सिद्दीकीबरोबर जॅकी श्रॉफची पत्नी आएशा श्रॉफ, कंगना राणावत, हृतिक रोशन, नवाजुद्दीन सिद्धीकी, त्याची बायको, साहिल खान यांची नावे पुढे आलेत. त्यामुळे बॉलिवूड कनेक्शनमुळे या प्रकरणाला वेगळीच चर्चा आली.



सीडीआर अर्थात....


प्रेम, संशय, अविश्वास आणि धोका या सगळ्याचा हा खेळ. प्रेम आणि विश्वास संपला की एकमेकांवर पाळत ठेवली जाते. त्यामध्येच महत्त्वाचं ठरतं हे सीडीआर. सीडीआर अर्थात कॉल डेटा रेकॉर्ड. सोप्या भाषेत सांगायचं तर कुणाचं कुणाशी काय बोलणं झालं, त्याचा रेकॉर्ड. घटनेनं दिलेल्या खाजगी आयुष्याच्या अधिकाराच्या कलमानुसार कुणीही कुणाचेही फोन टॅप किंवा रेकॉर्ड करू शकत नाही. पण तसं केल्याप्रकरणी प्रसिद्ध वकील रिझवान सिद्दीकी पोलिसांच्या ताब्यात होता. 


रिझवानच्या चौकशीतून गौप्यस्फोट


रिझवान सिद्दीकीच्या चौकशीतून नवनवे धक्कादायक गौप्यस्फोट होतायत. आता 
अभिनेता  जॅकी श्रॉफची पत्नी आएशा श्रॉफचीही सीडीआर काढल्याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. आएशा श्रॉफनं अभिनेता साहिल खानचे सीडीआर काढून ते रिझवानला दिल्याचा संशय आहे. आयशा श्रॉफ आणि साहिल खान यांच्यात व्यावसायिक वाद झाले. त्यानंतर आयशा श्रॉफनं साहिल खानचा सीडीआर रिझवानला पाठवला होता. 


खासगी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात 



गेल्यावर्षी चर्चेचा विषय ठरलेल्या हृतिक रोशन आणि कंगना राणावतत यांच्या भांडणाचेही रिझवान सिद्दीकीशी कनेक्शन असल्याचं पुढे आलंय. कंगनानं हृतिक रोशनचा एक नंबर रिझवान सिद्दीकाला दिल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय. रिजवान सिद्धिकी मॅग्नम नावाच्या एका खासगी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होता. त्याच्या लॅपटॉपमध्ये ही सगळी माहिती सापडलीय.


आता त्यामध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत, ते सगळे पोलीस चौकशीच्या रडारवर आहेत. त्यामुळे आता आणखी कुठल्या सेलिब्रिटींची नावं लॅपटॉपमधून बाहेर येतात, कुणाकुणाचा पर्दाफाश होणार आणि कुणाकुणाला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागणार, याची उत्सुकता आहे.