Badlapur Crime News: बदलापूर स्थानकात गुरुवारी एका व्यक्तीने संध्याकाळच्या वेळी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. आता हा गोळीबार नेमका का करण्यात आला होता? याचे कारण समोर आले आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या विकास पगारेला बेड्या ठोकल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापूर रेल्वे स्थानकातील गोळीबाराची घटना ही पैशांच्या वादातून घडली होती. स्थानकात गोळीबाराचा आवाज ऐकून प्रवाशांमध्ये एकच धावपळ झाली होती. तसंच, एक व्यक्ती जखमीदेखील झाला होता. गोळीबारानंतर हल्लेखोर तरुण पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास पगारे आणि शंकर संसारे या दोघांमध्ये बदलापुर रेल्वे स्थानकाबाहेर पैशावरून वाद झाले होते,त्यानंतर ते दोघे रेल्वे स्थानकावर आले,यावेळी वाद वाढल्याने विकासने रिव्हॉल्वरमधून शंकरवर दोन गोळ्या झाडल्या.


ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकावर गोळीबार होताच मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान रेल्वे पोलिसांनी मोठ्या हिमतीने रेल्वे ट्रॅकमधून पाळणाऱ्या विकासाला ताब्यात घेतले. कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान घटना घडली तेव्हा चौघे जण होते. पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातून फायरिंगची घटना घडली. चौघेही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळा पोलीस ठाणे, दोन गुन्हे उल्हासनगरमध्ये दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलीस उपायुक्त यांनी दिली. दरम्यान रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडल्याने स्थानकावरील सुरक्षेच्या संबंधी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने प्रावाशांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे.