किरीट सोमय्या यांचे कथित वादग्रस्त व्हिडीओ प्रकरण; मुंबई पोलिसांकडून तपास सुरु
कथित वादग्रस्त व्हिडिओ क्लिपची सत्यता तपासा. किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री, आयुक्तांना पत्र लिहून मागणी केली होती. तर, व्हिडिओप्रकरणी विरोधक आक्रमक झाले होते.
Kirit Somaiya Viral Video: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून (Viral Video) चांगलाच गदारोळ माजला आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोमय्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली होती. त्याशिवाय राज्य महिला आयोगानं देखील मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
किरीट सोमय्यांच्या वादग्रस्त व्हिडिओ क्लिपवरून ठाकरे गटाचा विधानपरिषदेत जोरदार हल्लाबोल
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांच्या वादग्रस्त व्हिडिओ क्लिपवरून ठाकरे गटाने विधानपरिषदेत जोरदार हल्लाबोल केला. मराठी अधिका-यांच्या पत्नींचं एक्सटॉर्शन करण्यात आल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय. 8 तासांचे व्हिडिओ पुरावे म्हणून पेनड्राईव्हद्वारे विधानपरिषद सभापतींना त्यांनी सादर केले. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून कठोर कारवाईची मागणी ठाकरे गटाने केलीय. तर या प्रकरणात कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, तसंच वरिष्ठ स्तरावर याची सखोल चौकशी केली जाईल असं गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलंय.
किरीट सोमय्यांच्या कथित वादग्रस्त क्लिपवरून आता विरोधक आक्रमक झालेत. स्वतःच लावलेल्या आगीत सोमय्या होरपळले असा टोला काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोलेंनी लगावला, तर गृहमंत्री फडणवीसांकडून न्यायाची अपेक्षा नाही, ते क्लिनचीट देतील अशी टीका भास्कर जाधवांनी केली. हमाम मे सब नंगे होते है हे आरोप करणा-यांनी लक्षात ठेवावं असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी दिला.
किरीट सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी
किरीट सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. सोमय्यांची आक्षेपार्ह क्लिप व्हायरल झालीय. त्याप्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. सोमय्यांनी छळलेल्या पीडित महिलांना राज्य सरकार मदत करणार की नाही असा सवाल काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी विचारला. किरीट सोमय्यांना फडणवीस क्लिनचीट देतील अशी टीका भास्कर जाधवांनी केलीय. देवेंद्र फडणवीसांकडून न्याय मिळण्याची शक्यता वाटत नाही असं ते म्हणाले.