Mumbai News Today: भिवंडी तालुक्यातील पडघा पोलिस स्थानकाच्या परिसरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 48 तासांच्या आतच आरोपींना पकडण्यात यश आले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपीचे नाव ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमिन हादरली आहे. हल्लेखोर हा मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातच कार्यरत असल्याचे समोर आले आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया. (Mumbai Police News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी सूरज देवराम ढोकरे यांला अहमदनगर पोलिसांच्या मदतीने कोल्हार येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भिवंडी तालुक्यात अंबाडी-वाशिंद रोडवरील पाइपलाइन जवळ असलेल्या मैंदे गावातून जाणाऱ्या दोन बाइकस्वारांचा  13 ऑक्टोबर रोजी पाठलाग करण्यात आला. त्याचवेळी युवकांवर जवळपास 8 वेळा गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात भरती करण्यात आले. 


दोन तरुणांवर गोळीबार


आरोपीने दोन तरुणांवर गोळीबार करत त्यांच्याकडे असलेले पैसे लंपास करत तिथून पळ काढला. गोळीबार आणि लूटीचे प्रकरण गंभीर असल्याचे पाहून गणेशपूरी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि शाहपुर उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पडघा, कसारा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरात पथके पाठवली होती. 


अहमदनगरला पळून चालला होता आरोपी 


पोलिसांना मिळालेल्या सूचनेनुसार, आरोपी नाशिकच्या बसमध्ये बसून अहमदनगर येथे पळून जात आहे. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी अहमदनगर पोलिसांच्या पथकाने कोल्हारजवळ नाकाबंदी करुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ असलेले पिस्तूलही जप्त करण्यात आले. आरोपी हा मुंबई पोलिस दलात क्यूआरटी जवान म्हणून कार्यरत आहे. 


ऑनलाइन गेमचा नाद 


आरोपीने पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार, ऑनलाइन गेमच्या नादात त्याने लाखो रुपये गमावले होते. त्यामुळं त्याने विविध बँकांसोबतच पतपेढ्यातून 40 ते 42 लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र,कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्याने चोरीचा मार्ग निवडला. आरोपीने म्हटलं आहे की, तो याआधीही भिवंडी आणि अंबाडी परिसरात आला होता.