मुंबई : मुंबईसह कोकणात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ढगफुटीची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. (Monsoon Update : Heavy rainfall Mumbai and Maharashra nearest area ) आज सकाळी मुंबई आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. आता पावसाचा जोर काही ठिकाणी कमी झाला आहे तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतायत... हवामान खात्यानं मुंबई मध्ये काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यानुसार प्रशासन सज्ज झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला अजून दोन दिवस लागतील असा अंदाज मुंबई हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्या मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मात्र कोकणात अलिबागपर्यंत, पुणे आणि मराठवाड्याचा काही भाग असं सध्या मान्सूनचे क्षेत्र आहे. मान्सूनची आगेकूच थांबली असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. 



मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणात शेतीच्या कामांची लगबग सुरू झालीय. किमान यंदा तरी निसर्गची कृपादृष्टी राहू दे असं साकडं कोकणातला शेतकरी घालतोय. गेल्यावर्षी वरूण राजाच्या अवकृपेमुळे भातशेतीचं नुकसान झालं होतं. यंदा तरी शेती समाधानकारक होईल, अशी शेतक-याला अपेक्षा आहे. कोकणात गेली दोन वर्षं वादळ आल्यानं शेतक-यांचं बरंच नुकसान झालं. 


वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर, सेलू, हिंगणघाट, वर्धा, पुलगाव,देवळी,आर्वी,आष्टी तालुक्यांत पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने वाहनचालकांची यावेळी चांगलीच तारांबळ उडाली तर ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला. जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसापासून दिलासा मिळाला. वातावरणातही गारवा आला. 



भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अर्ध्या तासाच्या पावसामुळे अनेक झाडं कोलमडून पडली. तुमसर-भंडारा महामार्गावर झाड कोसळल्यानं वाहतूक कोलमडली.