उरणहून थेट गाठता येणार मुंबई व नवी मुंबई; आठवड्याभरात सुरू होतेय लोकल, अशी असतील स्थानके
Nerul-Uran Railway: मुंबई व लगतच्या परिसरात लोकलचा विस्तार करण्याचा प्रयत्न होत आहे. खारकोपर- उरण रेल्वे मार्गासह पाच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Mumbai Local Train Update: मुंबई व मुंबईलगतच्या नागरिकांचा प्रवास सुखाचा व आरामदायी व्हावा यासाठी मुंबई लोकलचा आणखी विस्तार करण्यात येत आहे. तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग येत्या आठवड्याभरात प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील खारकोपर ते उरण मार्गावरील पाच स्थानकांच्या कामाला वेग आला आहे. या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गावर आठवडाभरात लोकल ट्रेन धावणार आहे. त्यामुळं उरणकरांना आता वेळेत मुंबई गाठता येणार आहे.
खारकोपर ते उरण रेल्वे मार्गासह पाच स्थानकांचे काम सुरू असून आता अंतिम टप्प्यात आले आहे. 14.6 किलोमीटर लांबीच्या दुहेरी रेल्वे मार्ग असून यात गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच रेल्वे स्थानके उभारली जात आहे. या पाचही स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मार्चमध्ये खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गावरुन लोकल रेल्वे धावली होती. त्यामुळं उरणकरांना आता हा रेल्वे मार्ग कधी सुरू होतोय याचे वेध लागले होते.
26 वर्षांनंतर सुरू होतोय रेल्वेमार्ग
नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग 1997 मध्ये मंजूर करण्यात आला होता. मात्र, जमिनीचे संपादन, निधीची कमतरता यामुळं गेल्या 26 वर्षांपासून हा मार्ग रखडला होता. 26.7 किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील नेरूळ बेलापूर ते खारकोपर हा पहिला टप्पा 2018 मध्ये पूर्ण झाला होता. तर, उर्वरित 14.3 किलोमीटरचे खारकोपर ते उरण पर्यंतचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1782 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
पंतप्रधान करणार उद्घाटन
खारकोपर ते उरण या मार्गाचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. सदर रेल्वे प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठवडाभरात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेनेही त्याची पूर्वतयारी सुरू केल्याचे कळतेय.
असा होणार फायदा
उरण नेरूळ रेल्वे मार्गामुळं सीएसएमटी ते उरण असा थेट रेल्वेप्रवास करता येणार आहे. त्यामुळं मुंबई, नवी मुंबई आणि उरण शहराशी जोडले जाणार आहे.
नेरूळ ते उरण रेल्वे मार्गावर अशी असतील स्थानके
नेरूळ, सीवूड-दारावे, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावाशेवा, रांजणपाडा, द्रोणागिरी आणि उरण या एकूण अकरा रेल्वेस्थानकांचा यात सामावेश आहे.