Mumbai University Course: मुंबई विद्यापीठात १९६३ मध्ये स्थापन झालेला संस्कृत विभाग यंदा षष्ठ्यब्दीपूर्ति साजरी करीत आहे. यानिमित्ताने या विभागामार्फत ४ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना सुरुवात होत आहे. ज्यामध्ये एम. ए. योगशास्त्र, एम. ए. अर्थशास्त्र, एम. ए. आर्ष महाकाव्य-पुराणे, आणि एम. ए. अभिजात संस्कृत साहित्य या चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम्. ए. योगशास्त्र या अभ्यासक्रमामध्ये संस्कृत भाषेमध्ये असणारे योगविषयक ग्रंथांचे अध्यापन केले जाणार आहे. त्याला प्रात्यक्षिकाची जोड दिली जाईल. योगशिक्षक, योगाभ्यासक व जिज्ञासु या सर्वांनाच हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. 


एम्. ए. आर्ष महाकाव्ये आणि पुराणे या अभ्यासक्रमात रामायण-महाभारत व पुराणांचे विविधांगी दृष्टीकोनांतून चिकित्सक अध्ययन करणे अपेक्षित आहे. चित्रपट व मालिकांच्या निर्मितीसंस्थांना सहाय्य करण्याचे काम हे विद्यार्थी करू शकणार आहेत. 


एम्. ए. अर्थशास्त्र हा अभ्यासक्रम कौटिल्य अर्थशास्त्र व तत्सम ग्रंथ यावर आधारीत आहे. चाणक्यनीतिचे उपयोजन विद्यार्थी विविध पातळ्यांवर करू शकतील. एम्. ए. अभिजात संस्कृत साहित्य या अभ्यासक्रमात संस्कृत भाषेमध्ये असलेल्या प्रचुर वाङ्मयाची ओळख आणि रसास्वाद घेतला जाणार आहे.


या चारही अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधारकाला प्रवेश घेता येईल मात्र २०० गुणांची प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असेल. संस्कृत भाषा ही या ज्ञानशाखांचा मूलस्रोत असल्याने या सर्वच अभ्यासक्रमांमध्ये संस्कृत भाषा व व्याकरण यांचे प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना करुन देण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. 


त्याचबरोबर भगवद्गीतेविषयक पदविका अभ्यासक्रम हा मुंबई विद्यापीठाकडून प्रथमच सुरु केला जात आहे. आध्यात्मिक संस्थांकडून भगवद्गीतेची शिकवण दिली जात असली तरी भगवद्गीतेचे विविधांगी दृष्टिकोनांतून विवेचन व विश्लेषण करणारा अभ्यासक्रम या दृष्टीने हा अभ्यासक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरेल. या अभ्यासक्रमासाठी १२ वी उत्तीर्ण असणे ही किमान अर्हता असून वयाची कोणतीही अट नाही.


हीरक महोत्सवानिमित्त प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली या विषयावर ६० व्याख्यानांचे आयोजन संस्कृत विभागाद्वारे आभासी माध्यमातून केले जाणार असून ही व्याख्यानमालिका सर्वांसाठी खुली असणार आहे. अधिक माहिती  www.sanskritbhavan.mu.ac.in या वेबसाइट मिळणार आहे.


“एम्. ए. संस्कृत हा अभ्यासक्रम विविध विशेष विषयांसहित (स्पेशलायझेशन) गेली अनेक वर्ष चालवला जातो. त्याव्यतिरिक्त विशिष्ट ज्ञानशाखांवर केंद्रित  (सुपरस्पेशलाइज्ड) असे अभ्यासक्रम सुरु करण्याचा विभागाचा मानस होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञानप्रणालीला महत्त्व देण्यात आले आहे. त्या दृष्टीने संस्कृत विभागाद्वारे चालवले जाणारे अभ्यासक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी प्रतिक्रिया  मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या  विभागप्रमुख डॉ. शकुंतला गावडे यांनी दिली.