Bike का थांबवली! मुंब्र्यात दुचाकीस्वाराचा वाहतूक पोलिसावर चाकूने हल्ला... Video व्हायरल
नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तात्पुरती कारवाई करुन आरोपींना सोडण्यात येतं. त्यामुळे आरोपींना धाक राहिलेला नाही. आता मुंब्र्यात पोलिसावर थेट चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : ठाणे जिल्हयातल्या (Thane District) मुंब्रा (Mumbra) इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्रा परिसरात एका माथेफिरूने वाहतूक पोलिसावर (Traffic Police) चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना पोलीस कर्मचाऱ्याने कॅमेरात कैद केली आहे. मुंब्रा इथल्या शिमला पार्क इथं दुपारच्या वेळी एका बाईक स्वाराला (Bike Rider) ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याने अडवलं. या माथेफिरूने बाईक अडवण्याचा कारणावरून पोलीस कर्मचाऱ्यासोबत शाब्दिक बाचाबाची करण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेला आणि त्या माथेफिरूने आपल्या जवळ असलेला चाकू काढून ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. (Attempted knife attack on traffic police)
मात्र यावेळी उपस्थित प्रवासी आणि स्थानिकांनी या माथेफिरूला अडवल्याने पुढचा अनर्थ टळला. गफ्फार असे या माथेफिरूचं नाव असून तो एम आय एम (AIMIM) पक्षाचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुंब्रा पोलिसांनी (Mumra Police) गफ्फार आणि त्याची गाडी ताब्यात घेतली असून पुढची कारवाई केली जात आहे.
वाहतूक पोलिसांचा कपडे फाडले
काही महिन्यांपूर्वी मुंब्र्यात वाहतूक पोलिसावर हल्ला केल्याची घटना घडली होती. वाहतूक पोलिसांनी एका दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला पकडलं. नियम मोडल्याने त्यांचा परवाना ताब्यात घेतला. पण यावरुन भडलेल्या त्या तरुण आणि तरुणीने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी गर्दीतल्या काही लोकांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केली. तसंच त्यांचा गळा आवळण्याचाही प्रयत्न झाला. गर्दीचा फायदा घेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाइल देखील चोरण्यात आला.
कुर्ला इथंही वाहतूक पोलिसाला मारहाण
चार दिवसांपूर्वीच मुंबईतल्या कुर्ला इथं एका वाहतूक कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एका 53 वर्षांच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. कुर्ला पश्चिम इथल्या डेपो सिग्नलजवळ खालीद इसाक वसईकर याने दुचाकीवरुन जाता सिग्नल तोडलं. नियम मोडल्याने इथं उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसाने त्याला थांबवलं. पण खालीदने आरडाओरडा करत गर्दी जमवली. यावेळी गर्दीतल्या दोघांनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. त्यातल्या एकाने वाहतूक पोलिसांना कानशिलात लगावत धमकी दिली.
पुण्यातही अशीच घटना
पुण्यात कार्तिकी एकादशीसाठी बंदोबस्त करत असलेल्या महिला वाहतूक पोलिसाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. बंद करण्यात आलेल्या रस्त्यावरुन जात असल्याने या महिला वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावरुन दुचाकीवरील दोघांनी त्या महिला पोलिसाशी वाद घातला. इतकंच नाही तर त्यांनी तिच्या तोंडावर जोरदार फटकाही मारला. या महिला पोलिसाच्य मदतीसाठी आलेल्या पोलिसालाही त्यांनी माराहण केली.