आजीने केले बिबट्याशी दोन हात, आपल्या नातवांची केली धैर्याने सुटका
नातवासाठी आजीनं बिबट्याशी झुंज दिली आणि नातवाचे प्राण वाचवलेत.
ठाणे : नातवासाठी आजीनं बिबट्याशी झुंज दिली आणि नातवाचे प्राण वाचवलेत. मुरबाड तालुक्यात ही घटना घडली. कांती भाला असे या आजीचे नाव आहे. जांभळे काढण्यासाठी आजी आणि तिचा नातू हरेश आणि नरेश जंगलात गेले होते. त्यावेळी दबाधरुन बसलेल्या बिबट्याने हरेशवर झडप घातली. आजीने दगड धोंडे आणि कोयत्याच्या सहाय्याने वाघाशी झुंज देत नातवांची बिबट्यांच्या तावडीतून सुटका केली.
आजीची बिबट्याशी झुंज
६० वर्षीय आजीने बिबट्याची झुंज देऊन आपल्या दोन नातवांचे प्राण वाचवल्याची घटना मुरबाड तालुक्यतील आहे. आजीने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नरेश भाला (७) आणि त्याचा चुलत भाऊ हरेश (१३) हे दोघे भाऊ आज सुखरूप आहेत ते त्यांच्या आजीमुळे. आजीने बिबट्याची झुंज देत आपल्या दोन नातवांचे प्राण वाचवलेत. टोकावडे परिसरातील करपट वाडी वाडीत राहणारे हरेश भाला आणि त्याचा भाऊ नरेश हे आपल्या आजी सोबत शेतावर गेले होते.
जांभूळ खाण्यासाठी गेले आणि...
आजी शेतात काम करत असल्याने हे दोघेही शेजारी असलेल्या जांभळाच्या झाडावर जांभळे काढण्यासाठी गेले. मात्र या झाडाखाली आधीच दबा धरून बसलेल्या बिबटयाने हरेशवर झडप घातली. त्यावेळी हरेशच्या किंकाळया ऐकून आजीने नातवांकडे धाव घेतली आणि जोरदार आरडा ओरडा सुरु केला. त्यानंतर बिबटयाने हरेशला सोडून नरेशकडे आपला मोर्चा वळवला. मात्र आजीने दगड - धोंडे आणि कोयत्याच्या सहाय्याने वाघाशी झुंज देऊन आपल्या दोन्ही नातवांची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.
आजीने बिबटयाचा प्रतिकार करायला सुरुवात करताच प्रसंगावधान राखून नरेशने सुद्धा बिबट्याला दगडी मारायला सुरुवात केली. या हल्यामुळे बिबटया बिथरला आणि त्याने तेथून पळ काढला. मात्र बिबटयाने केलेल्या हल्ल्यात नरेश सह त्याचा लहान भाऊ हरेश यांच्या हातापायाला दुखापत झाली आहे. सध्या मुरबाडमध्ये बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे.
तो बिबट्या मृत
दरम्यान, भाला कुटूंबाला नुकसार भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, या हल्ल्याच्या दोन दिवसानंतर हा बिबटया हा याच परिसरता मृत अवस्थेत सापडला आहे. हा बिबट्या १० ते १२ वर्षांचा होता. त्याला आता शवविच्छेदनासाठी मुंबईच्या संजय गांधी उद्यानात नेण्यात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच बिबटयाच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.