एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना गुंगीचे औषध, तिघांचा मृत्यू
सातारा: जिल्ह्यामधील जावळी तालुक्यातील मेढा मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना गुंगीचे औषध देऊन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला.
सातारा : जिल्ह्यामधील जावळी तालुक्यातील मेढा मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना गुंगीचे औषध देऊन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. यापैकी तिघांचे मृतदेह सापडलेत. तर एका मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. हे मृत कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामणोली गावात राहणारे आहे.
सातारा जिल्ह्यात सिरियल किलर संतोष पोळ हत्याकांडासारखी पुनरावृत्ती झाली आहे. जावळी तालुक्यातील मेढा मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा खून करून मृतदेहाचे तुकडे करून फेकून देण्याचा विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असून अजून एका मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. तानाजी जाधव, मंदाकिनी जाधव, तुषार जाधव आणि विशाल जाधव अशी त्यांची नावे आहेत. जाधव कुटुंबातील मुलांना सैन्यदलात भरती करण्याचे आमीष दाखवून पैसे घेतल्याच्या कारणावरून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी जावळी तालुक्यातील सोमर्डी गावातील संशयित आरोपी योगेश निकम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामनोली गावातील असल्याची माहिती समोर येते आहे. दोन मुलांसह त्याचा आई वडीलांना घाटातील जंगलात मारून ते मृतदेह प्लास्टिक बॅगेत भरून या घाटात फेकून देण्यात आले होते. येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांना वास येऊ लागल्यानंतर मेढा पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने यातील तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. अजून एका मृतदेहाचा शोध सुरू आहे.
हे तीन मृतदेह एकाच दिवशी पोलिसांना सापडले नाहीत. ११ ऑगस्टला पहिला मृतदेह सापडला. त्यानंतर २९ ऑगस्टला एका महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर ३१ ऑगस्टला काल एका मुलाचा मृतदेह शोधण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांना यश आले आहे. हे हत्याकांड नेमके कोणत्या कारणातून झाले, याचा तपास पोलीस करत आहे. मात्र एकाच कुटुंबातील चौघांची अशी हत्या केल्याने सातारा जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.