हात बांध, उशीने तोंड दाब... आईच्या मोबाईलमधलं `ते` संभाषण मुलीच्या हाती लागलं आणि...
मोबाईल संभाषणावरून असा झाला वडिलांच्या हत्येचा उलगडा, मुलीची आईविरोधात तक्रार
चंद्रपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या सहाय्याने खून केल्याची खळबळजनक घटना तब्बल तीन महिन्यानंतर ब्रम्हपुरी शहरात उघडकीस आली आहे. मोबाईल संभाषणाच्या रेकॉर्डिंगवरून वडिलांच्या खुनाचे गूढ उकलण्यात मुलीला यश आलं. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आईसह तिच्या प्रियकराला अटक केली. रंजना श्याम रामटेके ( वय 50, रा. गुरुदेवनगर, ब्रह्मपुरी) आणि मुकेश राजबहादूर त्रिवेदी (वय 48, रा. हनुमान मंदिराजवळ, पेठ वार्ड, ब्रह्मपुरी) अशी आरोपींची नावं आहेत.
ब्रम्हपुरी शहरातील आंबेडकर चौकात आरोपी रंजना रामटेकेचं जनरल स्टोअर्स दुकान आहे. तर शेजारीच मुकेश त्रिवेदी यांचं भाजीपाला आणि बांगडीचं दुकान आहे. त्यामुळे त्रिवेदी याचे रंजनाच्या घरी नेहमी येणे-जाणे सुरू होते. त्यातून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. संशयित आरोपी महिलेला दोन मुली आहे. एका मुलीचे शिक्षण बीएससीपर्यंत झाले असून ती नागपूर इथं एका मॉलमध्ये काम करत होती. 6 ऑगस्ट 2022 ला सकाळी तिच्या आईने फोन करून वडिलांचं हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली.
त्यावेळी दोन्ही बहिणी नागपूरमध्ये होत्या. वडील वनविभागात क्लार्क पदावरून निवृत्त झाले होते. 66 वय असल्याने हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सत्य मानून त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बहिणी परत नागपूरला गेल्या. दरम्यान, आईचे वागणे बदलल्याचे दोन्ही मुलींच्या लक्षात आलं. आरोपी मुकेश त्रिवेदी याचे घरी येणे जाणे वाढले होते. त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याने, आईला आणि त्रिवेदीला मुलींनी समज दिली होती. आई एकटी राहत असल्याने लहान मुलगी काही दिवसांत ब्रह्मपुरी इथं परत आली.
खून कसा केला : मोबाईल संभाषणामध्ये उल्लेख
घटनेच्या काही महिने आधी लहान मुलीने तिचा मोबाइल आईला दिला होता. त्यात ती आपला सिम टाकून वापरत होती. मोबाईल हाताळत असताना वडील मरण पावल्यानंतर आईच्या मोबाइलमधील त्रिवेदी याच्यासोबत 6 ऑगस्टला पहाटे 2.14 वाजता जवळपास 11 तास बोलल्याची त्यात रेकॉर्डिंग आढळली. मुलीने ही रेकॉर्डिंग आपल्या मोबाइलमध्ये ट्रान्स्फर केली. त्यात वडिलांचे हात बांधले, विषारी द्रव्य पाजले आणि उशीने तोंड दाबले, असा उल्लेख आहे.
त्रिवेदी याने अंथरूण नीट करून सकाळी सर्वांना पती गेल्याचे सांग, असा सल्ला दिल्याचंही त्या संभाषणात आढळलं. यावरून मोठ्या मुलीने शनिवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी रंजना रामटेके आणि मुकेश त्रिवेदी या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर पती शाम रामटेके यांचा खून केल्याची कबुली महिलेने दिली. पोलिसांनी रंजना रामटेके आणि तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.