Crime News : देशात आज कितीही स्त्री - पुरुष समानेबाबत भाषणं केली जात असली तरी काही प्रमाणात जुन्या विचारांचा पगडा अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळतोय. मुलगी नको म्हणून स्त्री भ्रूण हत्यासारखे (Female feticide) प्रकार केले जात आहेत. मात्र नागपुरातून (Nagpur) काही वेगळाच प्रकार समोर आलाय. वर्षभरापूर्वी मुलगा नको म्हणून बापानेच एका वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार नागपूरमध्ये समोर आला होता. याप्रकरणी निर्दयी बापाला सत्र न्यायालयाने आजन्म कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला मुलगा नाही मुलगी हवी होती


नागपूरमधील वाकोडी गावात एका 40 वर्षीय मजुराने पत्नीशी झालेल्या भांडणानंतर आपल्या एक वर्षाच्या मुलाची हत्या केली होती. भजन मेहताब कवरेती असे या आरोपीचं नाव आहे. 25 मे 2021च्या रात्री वाकोडी गावातील रहिवासी आरोपी भजन मेताब कावरेती याने त्याच्या पत्नीकडे दारू विकत घेण्यासाठी पैसे मागितले आणि तिने त्याला नकार दिला होता. पैसे न दिल्याने त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी घरातील एका वर्षाच्या मुलावर त्याची नजर पडली. मला मुलगा नाहीतर मुलगी हवी होती असे म्हणत त्याला उचलले. त्यानंतर पायाला धरुन त्या मुलाला घरातील अंगणात असणाऱ्या दगडावर आपटले. यामध्ये त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.


गंभीर दुखापतीमुळे बाळाचा मृत्यू


मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने मृत मुलाला घरात ठेवले होते आणि पोलीस येण्याआधी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.


यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. पोलिसांनी न्यायालयात भजन कवरेती विरुद्ध आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी वकील आसावरी परसोडकर यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायाधिश एस.एम.एस.ए. अली यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.